कोल्हापूर - सोनी टीव्हीवर 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचा एक भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा 'एकेरी' उल्लेख करण्यात आला. यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना महाराष्ट्राबरोबरच देशातील जनता हृदयात स्थान देते. त्या शिवाजी महाराजांबद्दल एकेरी उल्लेख आम्ही कदापिही सहन करणार नाही, असे ते म्हणाले.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुढे बोलताना ज्याप्रमाणे सिनेमांना सेन्सॉर आहे. त्याप्रमाणे वाहिन्यांना सुद्धा असायला हवे, अशी मागणी केली. तसेच यामागे काही षडयंत्र आहे का, हे तपासावे असेही खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले. याचे उत्तर सोनी टीव्हीचे प्रशासन काय देतंय याकडे शिवप्रेमींचे लक्ष लागले आहे.
६ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता सोनी टीव्हीवर 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचा एक भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा 'एकेरी' उल्लेख करण्यात आला होता. अमिताभ बच्चन यांनी समोरच्या स्पर्धकाला 'इनमे से कोन से शासक मुगल सम्राट औरंगजेब के शासक थे'...? असा प्रश्न विचारला आणि या प्रश्नावर नंतर महाराणा प्रताप, राणा सांगा, महाराजा रणजीत सिंह आणि शिवाजी, असे ४ पर्याय देण्यात आले होते. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केल्यामुळे संतप्त शिवप्रेमींनी सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांना लक्ष्य केले आहे.