परभणी - संपूर्ण राज्यात पाच नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा होत आहे. परंतु परभणी जिल्ह्यातील नाट्य कलावंतांना हा दिन कुठे साजरा करावा ? असा प्रश्न पडला आहे. कारण एकमेव असलेले नटराज रंगमंदिर बंद अवस्थेत आहे. शहरात 1985 साली बांधण्यात आलेले नटराज मोडकळीस आले असून, 6 वर्षांपासून धूळखात पडले आहे. महापालिकेकडून या वास्तूची कुठलीही दुरुस्ती होत नसल्याने आज काही नाट्यकलावंतांनी संताप व्यक्त केला आहे.
शहरातील ज्येष्ठ नाट्यकलावंत विजय करभाजन, विनोद डावरे, प्रमोद बल्लाळ, प्रकाश बारबिंड, सुकन्या कुलकर्णी यांनी आज रंगभूमी दिनानिमित्त नटराज रंगमंदिरला भेट देऊन दुःख व्यक्त केले. तसेच संतापालाही वाट मोकळी करून दिली. महापालिका नटराजच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याने या कलावंतांनी खंत व्यक्त केली. तसेच परभणी शहरात एक नव्हे तर दोन नाट्यगृहांची आवश्यकता आहे. दोन्ही नाट्यगृह चांगल्या अवस्थेत चालू शकतात; परंतु एकमेव असलेले नटराज देखील बंद आहे. त्यामुळे परभणी शहरात नाटकांच्या सादरीकरणासाठी मुंबई-पुणे या ठिकाणचे कलावंत परभणीत नाटकांसाठी येण्यास नकार देतात. त्यामुळे व्यवसायिक तसेच सामाजिक, सांस्कृतिक नाट्य किंवा नाटकं गेल्या काही वर्षात परभणीत सादर होणे बंद झाले आहेत. तसेच स्थानिक कलावंतांना तालमीला जागा उरली नसल्याने या ठिकाणची नाट्यचळवळ देखील लोक पावत चालल्याची भावना व्यक्त केली आहे.