मुंबई - आपल्या सहज सुंदर अभिनयाने लाखो करोडो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री काजोलचा आज (५ ऑगस्ट) वाढदिवस आहे. अभिनेता अजय देवगनसोबत तिचे लग्न झाले आहे. मात्र, दोघेही एकमेकांना भेटण्यापूर्वी ते दुसऱ्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते. काजोलच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या भन्नाट अशा लव्हस्टोरीबद्दल...
काजोलने बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. विशेषत: शाहरुखसोबतची तिची जोडी आजही चाहत्यांच्या काळजात घर करुन आहे. 'कुछ कुछ होता है', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'बाजीगर' यांसारख्या बऱ्याच चित्रपटातील तिच्या भूमिका आजही लोकप्रिय आहेत.
तिच्या करिअरच्या सुवर्णकाळात तिने अभिनेता अजय देवगनसोबत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला होता. ९० च्या दशकात दोघांची 'हलचल' चित्रपटादरम्यान ओळख झाली. सुरुवातीला अजय फार कमी बोलायचा. त्यामुळे त्यांची मैत्री व्हायला वेळ लागला. दोघे एकमेकांचे मित्र बनण्यापूर्वी दुसऱ्या व्यक्तीसोबत नात्यात होते.
काजोल आणि अजयची मैत्री झाल्यावर ती अजयकडुन तिच्या रिलेशनशिपबाबत सल्ले विचारायची. अजयदेखील तिला ते सल्ले आवडीने देत असे. मात्र, हळूहळू काजोल आणि अजय एकमेकांच्या प्रेमात पडले.
![actress kajol celebrate her 44 th birthday](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4041595_a1.jpg)
२४ फेब्रुवारी १९९९ साली दोघींनी लग्नगाठ बांधली. दोघांचेही मराठमोळ्या पद्धतीने लग्न झाले होते. त्यांच्या लग्नाला आता २० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना युग आणि न्यासा ही दोन मुलेदेखील आहेत.
लग्नांनंतरही काजोलने अजयसोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. 'इश्क', 'प्यार तो होना ही था', 'दिल क्या करे', 'राजू चाचा' आणि 'यू मी और हम' हे त्यांचे एकत्र केलेले चित्रपट आहेत. त्यांची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी मानली जाते.
काही महिन्यांपूर्वीच ती 'हेलिकॉप्टर ईला' या चित्रपटात झळकली होती.