शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘महाराष्ट्र शाहीर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचा नातू केदार शिंदे करीत असून लेखनाची जबाबदारी सांभाळलीय प्रतिमा कुलकर्णी यांनी. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील बिनीचे शिलेदार, स्वातंत्र्यसेनानी कृष्णराव साबळे अर्थात शाहीर साबळे यांचं जन्मशताब्दी वर्ष पुढच्या वर्षी ३ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू होत आहे. या जन्मशताब्दी वर्षात शाहिरांना अभिवादन करण्यासह त्यांच्या जीवनकार्याचा वेध 'महाराष्ट्र शाहीर' या मोठ्या पडद्यावर येणाऱ्या चित्रपटातून घेतला जाणार आहे. शाहीर साबळे यांचा नातू आणि प्रख्यात दिग्दर्शक केदार शिंदे महाराष्ट्राच्या जडणघडणीतलं शाहिरांचं योगदान मोठ्या पडद्यावर साकारत आहेत.
लहानपणापासूनच सामाजिक चळवळींशी जोडले गेल्यानं साबळे यांना साने गुरुजी, क्रांतीसिंह नाना पाटील, भाऊराव पाटील, सेनापती बापट यांचा सहवास लाभला. १९४२च्या चले जाव चळवळीत, स्वातंत्र्यानंतर गोवा आणि हैद्राबाद मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सक्रीय सहभाग होता. कलावंत असल्यानं समाजातील त्रुटी, दोष लक्षात घेऊन त्यांनी अनेक समाज प्रबोधन करणारी प्रहसनं लिहिली. 'जय जय महाराष्ट्र माझा...' या महाराष्ट्र गीतासह 'या गो दांड्यावरून....', 'जेजुरीच्या खंडेराया जागराला या या....' अशी दर्जेदार लोकगीतं महाराष्ट्राला दिली. लोककलेच्या क्षेत्रात फार मोलाचं योगदान दिलेल्या या महान कलावंताचा पद्मश्री, संगीत नाटक अकादमी, महाराष्ट्र गौरव अशा अनेक पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.
साताऱ्याजवळील पसरणी येथे ३ सप्टेंबर १९२३ रोजी जन्म झालेले कृष्णराव साबळे जेमतेम सातवीपर्यंत शिकले होते. वडील भजन गात असल्यानं लहानपणापासून त्यांच्यावर झालेल्या संगीताच्या संस्कारातून त्यांच्यातला कलावंत घडला. 'संयुक्त महाराष्ट्र चळवळीतली तोफ' असं त्यांना म्हटलं जायचं. महाराष्ट्रात फिरून लोकगीतं संकलित करून त्यांची पहिली रेकॉर्ड केली, रंगभूमीवर मोबाईल थिएटरचा पहिला प्रयोग शाहीर साबळे यांनीच केला. तर तमाशा या लोककला प्रकाराला आधुनिक नाटकाशी जोडणं, मुक्त नाट्य हा नवा प्रकार निर्माण करणं असं अमूल्य योगदान शाहीर साबळे यांनी दिलं.
आता शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या जीवनकार्याचा वेध 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटातून घेतला जाणार आहे. अनेक नाटकं, टीव्ही मालिका केलेल्या ज्येष्ठ लेखिका आणि दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाचं लेखन करत आहेत. तर शाहिरांचेच नातू आणि दिग्दर्शक केदार शिंदे हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. रंगभूमी, टीव्ही मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये केदार शिंदे यांनी दमदार काम केलं आहे. नातवानंच आपल्या आजोबांवर चित्रपट करण्याचा दुर्मीळ योग या चित्रपटामुळे जुळून येणार आहे. चित्रपटात शाहिरांची आणि त्यांच्या समकालीन महत्त्वाच्या व्यक्तिरेखा कोण साकारणार अशा प्रश्नांची उत्तरं टप्प्याटप्प्यानं दिली जातील. जन्मशताब्दी वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
'महाराष्ट्र शाहीर'विषयी दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाला की, ‘नातू म्हणून मला ते मोठे वाटतातच. पण एक कलाकार म्हणूनही मला त्यांचं जीवन खूपच मोठं वाटतं. गेली अडीच वर्षं या चित्रपटाचे काम सुरू आहे. या चित्रपटातून शाहीर साबळे यांचा जीवनपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. आपले कलाकार किती मोठे होते, आपल्या मातीतून हे कलाकार कसे घडले, त्यांनी यश कसं मिळवलं, यश मिळवणं सहजसोपं असतं का, अशा अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी नव्या पिढीला हा चित्रपट मार्गदर्शक ठरेल.’
केदार पुढे म्हणाला की, ‘शाहीर साबळे यांचा संपूर्ण जीवनपट लोकांसमोर आणणं हे शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे. आजवर मी अनेक चित्रपट केलेले असले, तरी 'महाराष्ट्र शाहीर' हा माझ्यासाठी फारच जास्त महत्त्वाचा चित्रपट आहे. माझ्यातील कौशल्य पणाला लावून मी हा चित्रपट प्रेक्षकांपुढे आणणार आहे. पुढच्या कित्येक पिढ्या माझ्या आजोबांना लक्षात ठेवतील असा चित्रपट करणार आहे. लोककला, लोकसंगीत, लोकनृत्य, लोकनाट्य या बारा बलुतेदारांच्या कला प्रकारांना मोठ्या स्तरावर सादर करण्याचं काम शाहीर साबळे यांनी केलं हेही लोकांना कळायला हवं असा विचार माझ्या डोक्यात होता. शाहीर साबळे म्हणजे 'जय जय महाराष्ट्र माझा' आणि 'महाराष्ट्राची लोकधारा' असं जे लोकांना वाटतं, तसं ते नाही. 'महाराष्ट्राची लोकधारा' म्हणजे त्यांचं निवृत्तीनंतरचं आयुष्य होतं.’
जन्मशताब्दी वर्षात येणारा ‘महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट एक माणूस म्हणून, कलावंत म्हणून आणि नातू म्हणून केदार शिंदे याचा आपले आजोबा शाहीर साबळे यांना मानाचा मुजरा असेल.
हेही वाचा - सायरा बानू यांचा अँजिओग्राफीला नकार, दिलीप कुमार यांच्या मृत्यूने नैराश्य