मुंबई - मेक इन इंडिया संकल्पनेला प्रेक्षकांसमोर मांडणाऱ्या ‘वाह जिंदगी’ चित्रपटात संजय मिश्रा भूमिका साकारत आहेत. आता या चित्रपटाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि स्वदेशी जागरण मंचच्या सह-संयोजक डॉ. अश्विनी महाजन यांचे समर्थन मिळवले आहे.
महाजन यांनी समर्थन देत म्हटलं, की चिनी आयातीमुळे भारतीय अर्थव्यवस्था गंभीर संकटात सापडली आहे. यामुळे केवळ भारताचे मौल्यवान परकीय चलन कमी होत नाही तर आपल्या उत्पादन क्षेत्रालाही याचे नुकसान होत असून आपल्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे.
पुढे त्या म्हणाल्या, की निर्माता अशोक चौधरी यांच्या ‘वाह जिंदगी’ या चित्रपटामध्ये चिनी स्पर्धेविरूद्ध मोरबीच्या कुंभारकाम उद्योगातील संघर्षाचे चित्रण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या संकल्पनेवर हा चित्रपट आधारित आहे, हे जाणून आम्हाला आनंद झाला,
चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितलं, की अर्थ मंत्रालयाने चित्रपटाच्या प्रमोशनला पाठिंबा दर्शविला आहे. यापूर्वी या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरणही वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते झाले होते. या चित्रपटाची कथा एका व्यक्तीच्या संघर्षावर आधारित आहे. त्याला आपला भूतकाळ विसरायचा असतो. पुढे तो भारतात काही वस्तूंची निर्मिती करु लागतो आणि चीनी उत्पादनांशी स्पर्धा करतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन एफटीआयआयचे माजी विद्यार्थी दिनेश एस यादव यांनी केलं आहे. चित्रपटात संजय मिश्रा, विजय राज, नवीन कस्तूरिया, प्लाबिता बोरठाकुर आणि मनोज जोशी यांच्या भूमिका आहेत.