मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते नसीरुद्दीन शाह सध्या घरीच कुटुंबीयांसह स्वतःचा वेळ घालवत आहेत. महान कलाकृतींचा जनक विल्यम शेक्सपियर यांची नाटके वाचत असल्याचे त्यांनी मुलाखतीत बोलताना सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे बहुतेक अभिनेते-अभिनेत्रींनी घरीच स्वतःला वेगवेगळ्या छंदांमध्ये गुंतवून घेतले आहे.
आपण घरी राहूनही आनंदात वेळ घालवणार या लोकांपैकी असून टीव्ही पाहणे पुस्तके वाचणे यातच माझा बहुतेक वेळ घालवतो, असे शाह यांनी सांगितले आहे. शाह सध्या त्यांची दोन मुले विवान आणि इमाद यांच्यासह शेक्सपिअरची नाटके पाहत आहेत. हे दोघेही अभिनेते आहेत.
नसीरुद्दीन यांनी 2017 मध्ये आलेल्या 'द हंग्री' या बोर्नाली बॅनर्जी या बंगाली दिग्दर्शिकेच्या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट शेक्सपियरच्या टायटस अँड्रॉनिकस या नाटकावर बेतलेला होता. आता ते 'हाफ फुल्ल' या लघुपटात काम करत आहेत. हा निर्माते करण रावल यांचा पदार्पणातील लघुपट आहे. रावल यांच्यासह विक्रांत मेस्सी हेही काम करत आहेत.
या लघुपटाची कथा 'जेव्हा एक माणूस दुसऱ्या वयस्कर व्यक्तीला भेटतो आणि त्यानंतर महत्त्वाचा निर्णय घेतो, या व्यक्तीला भेटल्यानंतर त्याचा आयुष्य, मृत्यू आणि स्वतःकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो,' याभोवती गुंफलेली आहे. या लघुपटाची कथा माझ्या सध्याच्या आयुष्याशी मिळतीजुळती आहे, असे शाह या मुलाखतीत बोलताना म्हणाले.