मुंबई - गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'कुली नंबर १' चित्रपट १९९५ मध्ये प्रदर्शित झाला. डेविड धवन यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. ज्यानंतर आता डेविड धवन याच चित्रपटाचा सिक्वल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आली होती.
यापाठोपाठ आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. पुढील वर्षी म्हणजेच १ मे २०२० ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. या चित्रपटात वरूण धवन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर त्याच्या अपोझिट सारा अली खानची वर्णी लागली आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.
वरूण याआधीही डेविड धवन यांच्या 'मैं तेरा हीरो' आणि 'जुड़वा 2 ' सारख्या सिनेमांत झळकला होता. हे दोन्ही चित्रपट हिट ठरले. त्यामुळे, आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान या चित्रपटाच्या निमित्ताने सारा आणि वरूणची जोडी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.