नवी दिल्ली - दूरसंचाच्या (टीव्ही) पॅनेलच्या ओपन सेलला आयात करातून वगळावे, अशी एलजी कंपनीने मागणी केली आहे. त्यामुळे देशातील उत्पादक कंपन्यांना फायदा होईल, असे एलजीने म्हटले आहे. सध्या, देशात ओपन सेलवर पाच टक्के आयात शुल्क लागू आहे. एलजीचे पुण्यातील कारखान्यात उत्पादन घेतले जाते. दरवर्षी साधारणत: 30 लाख दूरसंच तयार करण्याची या कारखान्याची क्षमता आहे.
देशात टीव्ही निर्मिती आणि गुंतवणूक सुरुच ठेवणार असल्याचे एलजीने म्हटले आहे. ५ टक्के आयात शुल्क वगळल्याने 'मेक इन इंडिया'ला मदत होईल, असे एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे संचालक याँचुल पार्क यांनी म्हटले. कंपनीकडून आयात करण्यात येणारे दूरसंचाचे पॅनेल हे ओपन सेल स्थितीमध्ये असतात. त्यांना असेम्बल करून बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविले जाते. इतर टीव्ही कंपन्यासारखे एलजी टीव्ही ही मुक्त व्यापार करार असलेल्या व्हिएतनाम, मलेशिया आणि थायलंडमधून आयात करण्यात येत नाही. ही बाब एलजीने अधोरेखित केली आहे.
इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे संचालक याँचुल पार्क म्हणाले, आमचे मेक इन इंडियाबाबतचे धोरण अत्यंत स्पष्ट आहे. आम्ही अधिकाधिक गुंतवणूक करत आहोत. त्यात बदल करण्यात येणार नाही. एलजी ही दूरसंचाचे देशात पूर्णपणे उत्पादन करणारी एकमेव कंपनी आहे. तसेच देशात ओएलईडी तयार करणारी एकमेव कंपनी आहे. एलजीचा दूरसंच बाजारपेठेत २५ टक्के हिस्सा आहे. येत्या वर्षात हा हिस्सा २७ टक्के होईल, अशी कंपनीला अपेक्षा आहे. भारतीय दूरसंच बाजारपेठेत सॅमसंग, एलजी आणि सोनी या तीन प्रमुख कंपन्या आहेत.
सध्या तीनही कंपन्यांना नव्या दूरसंच कंपन्यांकडून तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. कारण नव्या दूरसंच कंपन्यांचे दर ब्रँडेड कंपन्यांहून कमी आहेत.