मॉरिशस Ayodhya Ram Mandir Mauritius : अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. जगभरात पसरलेले हिंदू धर्माचे लोक हा भव्य-दिव्य सोहळा साजरा करतील.
2 तासांची विशेष रजा : या पार्श्वभूमीवर मॉरिशस सरकारनं एक महत्त्वाची घोषणा केली. 22 जानेवारीला मॉरिशसमध्ये हिंदू धर्माच्या अधिकाऱ्यांना 2 तासांची विशेष रजा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यादरम्यान ते रामलल्लाच्या अभिषेकानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या स्थानिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतील. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांच्या नेतृत्वाखालील मॉरिशस मंत्रिमंडळानं शुक्रवारी याबाबत अधिकृत निवेदन जारी केलं. निवेदनात मंत्रिमंडळानं सोमवार, 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून दोन तासांची विशेष सुट्टी देण्याचं मान्य केलंय.
16 जानेवारीपासून सोहळा सुरू होणार : 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. या कार्यक्रमासाठी अनेक नेते आणि मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलंय. मंदिर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सोहळा 16 जानेवारीपासून सुरू होणार असून तो 7 दिवस चालेल. 16 जानेवारीला वैदिक विधी सुरू होतील.
मॉरिशसमध्ये हिंदू सर्वात मोठा धर्म : हिंदी महासागरातील मॉरिशसमध्ये हिंदू धर्म सर्वात मोठा धर्म आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, येथील सुमारे 48.5 टक्के लोकसंख्या हिंदू आहे. आफ्रिकेतील हा एकमेव देश आहे जिथे इतक्या मोठ्या संख्येनं हिंदू राहतात. जागतिक पातळीवर पाहिले तर हिंदू लोकसंख्येच्या बाबतीत भारत आणि नेपाळनंतर मॉरिशसचाच क्रमांक लागतो.
हे वाचलंत का :