काबूल - तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या दक्षिणी हेलमंद प्रांतात अफगाण सैन्याच्या शिबिरावर केलेल्या हल्ल्यात २३ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे.
या प्रांतातील गवर्नर यांचे प्रवक्ते उमर ज्वाक यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात इतर २० सैनिकही जखमी झाले आहेत. येथील वासेर जिल्ह्यात ४० तास चाललेली चकमक शनिवारी सायंकाळी संपली.
ज्वाक म्हणाले, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दहशतवाद्यांनी केलेले स्फोट आणि गोळीबारात सैन्याची वाहने आणि कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय, नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात एकूण ४० सैनिकांचा मृत्यू झाला आहे.