बैरूत - रशियाच्या सरकारने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये सिरियाच्या इदलिब प्रांतातील दहा नागरिकांचा गुरुवारी मृत्यू झाला. सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राईट्सने म्हटले आहे, की इदलिब प्रांतातील अरिहा शहरातील मृतांमध्ये कमीतकमी पाच महिलांचा समावेश आहे. येथे रशियन समर्थित सरकारी सैन्याने देशातील शेवटच्या प्रमुख बंडखोर बुरुजावर हल्ले केले आहेत.
या हल्ल्यात एका क्लिनिकजवळ बॉम्ब पडला. एटीपीच्या वार्ताहरांनी दिलेल्या वृत्तानुसार, हल्ल्यानंतर धुळीने माखलेल्या एका डॉक्टरने ओरडत अल-शमी क्लिनिकमधून बाहेर पळ काढला. या क्लिनिकच्या आसपासच्या तीन इमारतीही या हल्ल्यात कोसळल्या.
या हल्ल्यानंतर, गेल्या २४ तासांमध्ये रशियन एअर स्ट्राईकमुळे सीरियामध्ये मारले गेलेल्या एकूण नागरिकांची संख्या २१ वर पोहोचली आहे. या महिन्याच्या सुरुवातीस, रशियाने १२ जानेवारीपासून अंमलात आलेल्या बंडखोर समर्थक तुर्कीशी झालेल्या युद्धबंदीनंतर इदलिब प्रदेशात कोणतीही लढाऊ कारवाई सुरू करण्यास नकार दिला होता. मात्र यानंतर रशियाच्या हल्ल्यांमध्ये वाढच झाली आहे.
लष्कराच्या समर्थनार्थ सीरियामध्ये हजारो रशियन सैनिक तैनात केले गेले आहेत. तर, मॉस्कोच्या खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांची एक तुकडीही सीरियामध्ये कार्यरत आहे.
हेही वाचा : 'कोरोना'चा कहर : चीनमधील बळींची संख्या २१३, तब्बल १० हजार नागरिकांना संसर्ग..