तेहरान : इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिका आणि ब्रिटनमधील कोरोनावरील लसींना बंदी घातल्याचे शुक्रवारी जाहीर केले. अमेरिकेतील फायझर-बायोएनटेक कंपनीची लस आणि ब्रिटनच्या अॅस्ट्राझेनेका कंपनीची कोरोना लस यांवर इराणमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पाश्चिमात्य देशांवर आपला विश्वास नसल्याचे म्हणत खामेनी यांनी हा निर्णय घेतला आहे.
या देशांवर नाही विश्वास..
आपल्या देशाला एका टीव्ही संदेशातून संबोधित करत खामेनी यांनी सांगितले, की अमेरिका आणि ब्रिटन या देशांमधून येणाऱ्या कोरोना लसींवर बंदी घालण्यात आली आहे. या देशांमधील कोरोना रुग्णसंख्या आणि कोरोनाच्या बळींची संख्या पाहता हा निर्णय घेतला आहे. मला या देशांवर आजिबात विश्वास नाही. ते कदाचित आपल्या लसीची चाचणी इतर देशांवरही करु शकतात. याच यादीत फ्रान्सचाही समावेश असल्याचे खामेनी म्हणाले.
इतर देशांच्या लसींना मान्यता..
इतर देश, ज्याठिकाणी कोरोनाचा तितका प्रसार झाला नाही अशा ठिकाणांहून येणाऱ्या लसींना मात्र इराणमध्ये परवानगी देण्यात आली आहे. तसेच, इराणमध्येही लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याठिकाणी तयार होत असलेल्या लसींची मानवी चाचणी डिसेंबरमध्ये सुरू करण्यात आली होती.
हेही वाचा : अमेरिकेच्या संसदेतील हिंसाचारानंतर पोलीस प्रमुखांचा राजीनामा