शारजाह - दोन महिन्यांपासून आपल्या आईपासून दूर शारजाह येथे असलेल्या एका लहान मुलीने पुन्हा आईला भेटण्यासाठी मदत करावी, अशी आर्त हाक दिली आहे. एका वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. राशी असे या नऊ वर्षांच्या मुलीचे नाव आहे. तिने तिच्या सध्याच्या स्थितीचे वर्णन एका भावनिक पत्रातून केले आहे.
शनिवारी गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पेन्सिल स्केचमध्ये तिची आई पूनमबरोबर पुनर्भेट दाखवत कुटुंबासोबतच्या सुखी जीवनाचे चित्र रेखाटले आहे. पूनम असे तिच्या आईचे नाव आहे. त्या स्वतःच्या आजारी आईला भेटण्यासाठी भारतात आल्या. मात्र, कोविड-19 मुळे देशात लॉकडाऊन झाल्याने त्यांच्या विमानाचे उड्डाण रद्द होऊन त्या येथेच अडकून पडल्या.
"कृपया मला माझ्या आईला भेटण्यास मला मदत करा. मला तिची खूप आठवण येते. मी तिला 59 दिवसांपासून पाहिले नाही. आम्ही एकमेकांना पुन्हा भेटण्यासाठी खूप संघर्ष करत आहोत ..." असे दुबईत इंडियन हायस्कूलमध्ये (एचआयएस) इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या राशीने स्वतःच्या हाताने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. हे पत्र आता तिचे वडील हरेश करमचंदानी यांनी ट्विटरवर शेअर केले आहे.
इलेक्ट्रिक कंपनीत काम करणार्या हरेश यांनी गल्फ न्यूजला सांगितले की, पूनम 18 मार्चला त्यांच्या आजारी आईला पाहण्यासाठी मुंबईला आल्या होत्या. त्यांच्या आईचे दहा दिवसांनी निधन झाले.
त्यानंतर पूनम एप्रिलच्या सुरुवातीला पुन्हा शारजाहला जाणार होत्या. मात्र, कोव्हिड-19 मुळे लॉकडाऊन झाल्याने त्या भारतातच अडकल्या, असे हरेश यांनी सांगितले. आता ते एकटेच त्यांची 9 वर्षीय मुलगी राशी आणि 15 वर्षीय मुलगा क्रिश यांची काळजी घेत आहेत.