लंडन : ऑक्सफर्ड विद्यापीठातील वैज्ञानिकांनी तयार केलेल्या कोरोना विषाणूवरील लसीला पहिल्या टप्प्यामध्ये यश मिळाले आहे. ज्या रुग्णांवर ही चाचणी करण्यात आली, त्यांच्यामधील रोगप्रतिकार शक्ती वाढल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत.
लॅन्सेंट या वैद्यकीय नियतकालिकामध्ये याबाबत माहिती प्रसिद्ध झाली आहे. प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेल्या या चाचणीचे उद्दिष्ट केवळ लसीची सुरक्षितता तपासणे असते. मात्र, यामध्ये संशोधक हेदेखील पाहत होते, की रुग्णांमधील रोगप्रतिकारशक्तीवर याचा कसा आणि काय परिणाम होतो आहे.
या लसीची मानवी चाचणी एप्रिलमध्ये सुरू करण्यात आली होती. यासाठी एक हजार लोकांचा नमुना गट तयार करण्यात आला होता, ज्यांपैकी अर्ध्या लोकांना ही लस देण्यात आली. यामध्ये १८ ते ५५ वयोगटांमधील रुग्णांच्या प्रतिकारशक्तीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.
जगभरात कोरोना विषाणूवरील लस शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. युएईमध्ये तयार करण्यात आलेल्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू करण्यात आली आहे. सिनोफार्म सीएनबीजीच्या इनअॅक्टीव्हेटेड लसीची अबुधाबीमध्ये चाचणी सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी दिलेली ही पहिलीच लस आहे. तसेच, भारतातही कोव्हॅक्सिन आणि झायडस या लसींच्या मानवी चाचणीला परवानगी देण्यात आली आहे.
हेही वाचा : कोरोनावर लस विकसीत करत असल्याचा उत्तर कोरियाचा दावा