मॉस्को - रशियाची राजधानी असणाऱ्या मॉस्कोमधील एका अव्वल दर्जाच्या रुग्णालयातील प्रमुख डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या डॉक्टरने आठवड्याभरापूर्वीच राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट घेतली होती.
एक आठवड्यापूर्वी पुतीन यांनी मॉस्कोमधील कोम्मुनार्का रुग्णालयाला भेट दिली होती. यावेळी तिथले प्रमुख डॉक्टर डेनिस प्रोट्सेन्को यांची त्यांनी भेट घेतली होती. त्यावेळी पुतीन यांनी डॉक्टरांशी हस्तांदोलनही केले होते. पुतीन यांच्या या निष्काळजीपणाची आता सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळेच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही होत आहे.
कोम्मुनार्का रुग्णालयातील डॉक्टरांना भेटल्यानंतर मात्र पुतीन यांनी संरक्षक सूट आणि मास्क घालत रुग्णांची भेट घेतली होती. यानंतर पुतीन यांनीही कोरोनाची चाचणी केली की नाही, याबाबत सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
मंगळवारी एका दिवसात रशियामध्ये कोरोनाचे ५०० रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे एकूण २, ३३७ रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा : जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाखांच्या पुढे; 39 हजार दगावले