वेलिंग्टन - न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डर्न यांनी प्रदिर्घकाळ चाललेल्या प्रेमप्रकरणानंतर अखेर प्रियकराशी लग्न केले. न्यूझीलंड येथे गेल्या महिन्यात मशिदीत झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर जसिंडा चर्चेत आल्या होत्या. यावेळी त्यांनी देशाला उद्देशून केलेले सडेतोड भाषण चांगलेच गाजले होते. त्यानंतर आता लग्नाच्या विषयावरुन त्या चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या लग्नामागे अत्यंत रोचक कहाणीही आहे. इस्टरच्या सुट्यांमध्ये आर्डन आणि क्लार्क गेफोर्ड यांनी लग्नगाठ बांधली.
न्यूझीलंडच्या पंतप्रधान आर्डर्न यांचे प्रेम प्रकरण एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा कथानकासारखे आहे. झाले असे की, त्यांच्या प्रियकराने ५ वर्षापूर्वी त्यांना आपल्या मतदार संघातील एका समस्येबाबत तक्रार केली होती. या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी बराच कालावधी लागला. या दरम्यान दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. नेहमीच्या भेटींमुळे दोघांची आधी ओळख, नंतर मैत्री आणि प्रेम झाले. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले खरे पण आधी प्रपोज कुणी करायचा हा मोठा प्रश्न होता. पण अखेर क्लार्कने त्यांना प्रपोज केले. त्यांनी लगेच ते स्वीकार केले. आणि दोघांच्या प्रेमप्रकरणाला सुरवात झाली.
गेल्या वर्षी आर्डर्न यांना मुलगी झाली. त्यावेळी त्यांचे लग्न झाले नव्हते. लग्नापूर्वी मुलगी झाल्यानेही याची बरीच खरमरीत चर्चा झाली होती. पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्यानंतर त्या जगातील दुसऱ्या अशा महिला पंतप्रधान आहेत ज्यांना पंतप्रधान असताना मातृत्व अवकाश घ्यावा लागला होता.
गेफोर्ड हे एका टीव्ही चॅनेलमध्ये काम करतात. मुलगी झाल्यानंतर त्यांनी प्रदीर्घ सुटी घेतली होती. त्यांनीच गेल्या वर्षभरापासून तिचा सांभाळ केला. एका मुलाखतीत त्यांनी मिश्किलपणे म्हटले, की प्रियकर म्हणून मी जसिंडा यांची 'लिपस्टीक' दाताला लागू नये एवढी काळजी घेतो.
आता दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. बरेच दिवस चाललेल्या प्रेमप्रकरणानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या दरम्यान दोघांना कन्यारत्नही प्राप्त झाले. लग्नामुळे पुन्हा एकदा आर्डर्न चर्चेत आल्या आहेत. बाळासोबत दोघांनी काढलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.