इस्लामाबाद - गिलगिट बाल्टिस्तान या पाकव्याप्त काश्मीर भूप्रदेशाचा दर्जा पाकिस्तान सरकारने बदलला आहे. गिलगिट बाल्टिस्तान हा पाकव्याप्त काश्मीरचा भाग असून स्वातंत्र्यानंतर यावरून भारत पाकिस्तानमध्ये वाद सुरू आहे. मागील वर्षी भारताने जम्मू काश्मीरची स्वायत्ता रद्द करून त्याला देशाचा भाग बनवला. त्यानंतर आता पाकिस्ताननेही गिलगिट बाल्टिस्तानचा स्वायत्त दर्जा बदलला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकतेच गिलगिट बाल्टिस्तान भागाचा दौरा करत या निर्णयाची घोषणा केली. प्रांताचा दर्जा तात्पुरत्या स्वरुपात असल्याचे ते म्हणाले. सौदी अरेबियाने काही दिवसांपूर्वी गिलगिट बाल्टिस्तान हा भाग पाकिस्तानच्या नकाशातून वेगळा दाखवला आहे. भारताच्या ताब्यात असलेला काश्मीरही सौदी अरेबियाने नकाशात दाखवला नाही.
पाकिस्तानच्या निर्णयाचा विरोध
प्रांताचा दर्जा देण्यात आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. ८ ऑक्टोबरला पाकव्याप्त काश्मीरातील मुझ्झफराबाद शहरात मोठे आंदोलन झाले. 'जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट' आणि 'स्टुडंट लिबरेशन फ्रंट' या संघटनांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. पाकिस्तानच्या या निर्णयाविरोधात बलिदान देऊ मात्र, पाकिस्तानचा निर्णय मान्य करणार नाही, अशी भूमिका सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली आहे.