ढाका - तृतीयपंथी नागरिकांना कायमच अवहेलनेचा सामना करावा लागतो. अशा नागरिकांसाठी बांगलादेश सरकारने एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये तृतीयपंथी नागरिकांसाठी मदरसा सुरू करण्यात आला आहे. ढाक्याच्या काम्रागीचर परिसरात लोहार पुलाजवळ हा मदरसा आहे. 'द्वातुल कुराण थर्ड जेंडर मदरसा' असे या मदरस्याचे नाव आहे. या ठिकाणी एकाच वेळी विविध वयोगटातील १०० तृतीयपंथी नागरिक शिक्षण घेऊ शकतात, अशी सोय करण्यात आली आहे.
काल (शुक्रवारी) या मदरस्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ४० तृतीयपंथी उपस्थित होते. या ठिकाणी इस्लामिक शिक्षणाशिवाय तंत्रशिक्षण देण्यासाठी वेगळा विभाग सुरू करण्याचा विचारही प्रशासन करत आहे. जेणे करून तृतीयपंथीयांना शिक्षण घेऊन रोजगार मिळवता येईल.
२०१३मध्ये बांगलादेश सरकारने या लोकांना 'तृतीयपंथी' म्हणून कायद्याने ओळख दिली. त्यानंतर निवडणूक आयोगानेही त्यांचा मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घेतले. त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी सुद्धा देण्यात आली.
तृतीयपंथीयांसाठी सुरू करण्यात आलेला हा मदरसा, जगातील पहिलाच मदरसा आहे. ही देशासाठी गौरवाची बाब आहे. तृतीयंपथीयांना कायमच दुय्यम वागणूक दिली जाते. ते नमाजही अदा करू शकत नाहीत. मात्र, आता त्यांना कुराणमधील धडे मिळतील, अशी प्रतिक्रिया मदरस्यातील शिक्षक अब्दुल अझिज हुसैनी यांनी दिली.