वॉशिंग्टन डी. सी - इराण अमेरिका संघर्षामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाची धमकी दिल्यामुळे अमेरिकेच्या संसदेने ट्रम्प यांच्या अधिकारात कपात केली आहे. इराणविरुद्ध लष्करी कारवाई करण्याबाबतचे ट्रम्प यांचे अधिकार कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता संसदेच्या परवानगी शिवाय ट्रम्प यांना कोणतेही पाऊल उचलता येणार नाही.
अमेरिकेच्या 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह' ने गुरुवारी याबाबतचा ठराव पास केला आहे. ठरावाच्या बाजूने २२४ मते पडली तर ठरावाच्या विरोधात १९४ मते पडली. संसद सदस्या एलिसा स्लोटकिन यांनी हा ठराव संसदेत मांडला.
स्लोटकिन यांनी याआधी सीआयएच्या विश्वेषक म्हणून काम पाहिले आहे. शिया बंडखोरांबाबत त्यांचा चांगला अभ्यास आहे. तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय सुरक्षा विभागाच्या सहायक सचिवपदी काम केले आहे.
संसदेच्या अध्यक्षा पेलोसी यांनी ट्रम्प यांची इराणवर हल्ला करण्याची कृती भडकाऊपणाची असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसला विचारात न घेता सुलेमानी यांच्यावर रॉकेट हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आला. रॉकेट हल्लामुळे अमेरिकेचे दुतावासातील कर्मचारी, सैनिक आणि नागरिकांना धोका निर्माण झाला आहे, असेही पेलोसी म्हणाल्या.