केप कनार्व्हेल : स्पेस एक्स कंपनीमार्फत नासाच्या चार अंतराळवीरांना रविवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर पाठवण्यात आले. एखाद्या खासगी कंपनीमार्फत नासाचे अंतराळवीर अवकाशात पाठवण्याची ही पहिलीच वेळ होती. स्पेस एक्स या अंतराळ कंपनीच्या फाल्कन अवकाशयानातून हे अंतराळवीर रवाना झाले आहेत.
अमेरिकेतील केनेडी स्पेस सेंटरवरुन हे लाँच करण्यात आले. या लाँचला अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स उपस्थित होते. नासाने तीन महिन्यांपूर्वी अंतराळात मानव पाठवण्यासाठीच्या स्पेस-एक्सच्या तयारीची पाहणी केली होती. त्यानंतर नासाने हिरवा कंदिल दिल्याने आज हे लाँच पार पडले.
२७ तासांचा प्रवास..
रविवारी रात्री फाल्कनमधून निघालेले हे अंतराळवीर, सोमवारी रात्री उशिरा, किंवा मंगळवारी सकाळी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचतील. एकूण २७ तासांचा त्यांचा प्रवास असणार आहे.
चार अंतराळवीर..
या मोहिमेमध्ये चार अंतराळवीरांचा समावेश आहे. यामधील तीन अंतराळवीर अमेरिकेचे आहेत, तर एक जपानचा आहे. यात तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. एअर फोर्स कर्नल माईक हॉपकिन्स, फिजिसिस्ट शॅनॉन वॉकर आणि नेव्ही कमांडर व्हिक्टर ग्लोव्हर यांच्यासह जपानचे सोइची नोगुची यांचा या पथकात समावेश आहे. हॉपकिन्स त्यांचे हेड असतील. नेव्ही कमांडर ग्लोव्हर हे सहा महिन्यांचा कालावधी अंतराळ स्थानकावर व्यतीत करणारे पहिले कृष्णवर्णीय अंतराळवीर ठरणार आहेत.
एलॉन मस्क कोरोनाग्रस्त..
विशेष म्हणजे, स्पेस एक्स कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांना सध्या कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ते या लाँचला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांना कोरोनाची लक्षणं दिसत असल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना चाचण्या केल्या होत्या. मात्र, एक चाचणी पॉझिटिव्ह, तर दुसरी निगेटिव्ह आली होती. तरीही खबरदारी म्हणून ते सध्या अलगीकरणात आहेत.
हेही वाचा : वर्षाअखेर उपलब्ध होणार बायोएनटेक आणि फायझर कंपनीची कोरोना लस