वॉशिंग्टन - चीनबरोबरील व्यापारी युद्ध शमण्याच्या स्थितीत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या आयात धोरणावर टीका केली. भारताने हार्ले डेव्हिडसन दुचाकी आणि इतर अमेरिकेच्या उत्पादनावर मोठे आयात शुल्क लादल्याचा ट्रम्प यांनी दावा केला. यामुळे चीन-भारतासारख्या देशांकडून अमेरिकेचे कोट्यवधी डॉलरचे नुकसान होत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. ते विसकॉनसिन राज्याच्या ग्रीन बे शहरातील रिपब्लिकन पक्षाच्या राजकीय रॅलीत बोलत होते.
भारत हा टॅरिफ किंग असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाच्या राजकीय रॅलीत पुनरुच्चार केला. अमेरिकेच्या उत्पादनांवर भारत प्रचंड आयात कर लावत असल्याचा त्यांनी दावा केला. आपण दुसऱ्या देशांच्या उत्पादनावर आयात शुल्क लावत नाही. मात्र विसकॉन्सिनच्या पेपर कंपनीकडून निर्यात केली तर चीन, भारत आणि व्हिएतनामकडून मोठे आयातशुल्क लावण्यात येते, असे ते रॅलीत म्हणाले.
आम्ही चीनबरोबर (व्यापारी शुल्कातील बदल ) करत आहोत. त्याचप्रमाणे भारत व जपानबरोबर करत असल्याचे त्यांनी सांगितले. नवे आणि चांगले व्यापारी सौदे इतर देशांशी करत आहोत. आशा आहे, की सभागृह याला मंजुरी देईल, असे ट्रम्प यावेळी म्हणाले. भारतीय बाजारपेठ ही अमेरिकन कृषी उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ, वैद्यकीय उपकरणे आणि आयटी आणि कम्युनिकेशन्स उत्पादनांसाठी खुली करावी, अशी ट्रम्प यांची मागणी आहे.
भारताने नुकताच गव्हावरील आयात शुल्क हे ३० टक्क्यावरून ४० टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.