न्युयॉर्क - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भारताविरोधी गरळ ओकली. आमसभेत भाषण करताना खान यांनी पुन्हा एकदा भारताला अणुयुद्धाची धमकी दिली. आंतरराष्ट्रीय समुदायाने काश्मीरप्रश्नी लक्ष घातले नाही तर त्यांचे गंभीर परिणाम होतील, अशी धमकी इम्रान खान यांनी जागतिक मंचावरुन दिली.
जर दोन्ही देशांमध्ये पारंपरिक युद्ध सुरू झाले, तर पुढे जाऊन काहीही होण्याची शक्यता आहे. जो देश (पाकिस्तान) शेजाऱ्यापेक्षा ७ पटींने लहान आहे, तो काय करील. एक तर हार मानेल, किंवा मरेपर्यंत लढेल. आम्ही मरेपर्यंत लढू, मात्र, याचे परिणाम सीमेपार होतील, असे खान म्हणाले. संयुक्त राष्ट्रामध्ये बोलण्यासाठी निर्धारीत केलेल्या वेळेपेक्षा इम्रान खान १५ ते २० मिनिटे जास्त वेळ बोलले.
भारताबरोबर आम्ही चर्चेचा प्रयत्न केला. मात्र, मोदी सरकारने आमच्याशी चर्चा केली नाही. दोन्ही देशामंध्ये समान अडचणी असतानाही भारत चर्चा टाळत राहिला, असे खान म्हणाले. भारतामध्ये कोणताही हल्ला झाला तरी पाकिस्तानला जबाबदार धरले जाते, पुलवामासारखा आणखी एखादा हल्ला होण्याची शक्यता आहे. मात्र, त्या हल्ल्यासाठी आम्हाला जबाबदार धरले जाईल आणि वातावरण आणखी चिघळेल, असे इम्रान खान म्हणाले.
काश्मीरमधील संचारबंदी उठवल्यानंतर तेथे रक्ताचा सडा पडेल, त्यामुळे मुस्लीम जनता आणखी कट्टरतावादाकडे वळेल असे, खान म्हणाले. यावेळी बोलताना खान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप सरकारवर टीका केली.
पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यकांच्या हक्कांचे उल्लंघन होत असताना इम्रान खान यांनी काश्मीर प्रश्नावरुन संयुक्त राष्ट्रामध्ये गरळ ओकली. दहशतवाद्यांची फॅक्ट्री चालवणाऱ्यांकडून कोणत्याही सर्टिफिकेटची गरज नाही, अशा कठोर शब्दात संयुक्त राष्ट्रातील भारताच्या प्रथम सचिव विदिशा मैत्रा यांनी खान यांना उत्तर दिलं.
मोदींचे इम्रान खान यांना उत्तर
दहशतवाद ही केवळ एखाद्या देशाची नाही तर जागतिक समस्या आहे. त्यामुळे सर्वच देशांनी त्याच्याविरोधात उभे राहणे आवश्यक आहे. भारत नेहमीच दहशतवादाला विरोध करत आला आहे. भारताने जगाला युद्ध नाही, तर बुद्ध दिले, शांततेचा संदेश दिला. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता-मोहिमेमध्ये भारताचा सर्वात मोठा सहभाग राहिला आहे. या मोहिमांसाठी भारताने जेवढा त्याग केला आहे, तेवढा इतर कोणत्याही देशाने केला नसेल.