वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी जो बायडेन यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सोमवारी पार पडलेल्या इलेक्टोरल कॉलेजच्या मतमोजणीमध्ये बायडेना यांनी दणदणीत विजय मिळवत आपले अध्यक्षपद निश्चित केले. यानंतर आता अध्यक्षपदाचा दावा करणाऱ्या ट्रम्प यांचे सर्व मार्ग बंद झाले असून, त्यांना आपली हार कबूल करावी लागणार आहे.
बायडेन यांना मिळाली ३०६ मतं..
५३८ सदस्यीय इलेक्टोरल कॉलेजमध्ये विजयासाठी २७० हा आकडा गाठणे आवश्यक होते. जो बायडेन यांना एकूण ३०६ मतं मिळाली, तर ट्रम्प यांना केवळ २३२ मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे जनतेतून झालेल्या मतदानासोबतच आता इलेक्टोरल कॉलेजच्या मतदानामध्येही ट्रम्प यांचा दारुण पराभव झाला आहे.
ट्रम्प यांनी केला होता भ्रष्टाचाराचा आरोप..
गेल्या महिन्यातच अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. यामध्ये बायडेन यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले होते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मतमोजणीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. यासाठी त्यांनी न्यायालयातही धाव घेतली होती. त्यामुळे, कित्येक राज्यांमध्ये पुन्हा मतमोजणी करावी लागली होती.
यानंतर आता इलेक्टॉरल कॉलेजेसच्या मतदानाचे अहवाल वॉशिंग्टनला पाठवण्यात येणार आहेत. तेथे सहा जानेवारीला होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीत ते सादर केले जातील. या बैठकीचे अध्यक्षस्थान उपाध्यक्ष माईक पेन्स भूषवणार आहेत.
हेही वाचा : दिलासादायक..! ब्रिटन पाठोपाठ अमेरिकेत कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात