बामाको : माली देशाच्या सरकारने १८० जिहादींना सोडून देण्याचा निर्णय घेत, त्यांना देशाच्या उत्तर भागात हलवले आहे. रविवारी याबाबत एका अधिकाऱ्याने माहिती दिली. गेल्या सहा महिन्यांपासून जिहादींनी देशाच्या विरोधी पक्षातील एका मुख्य नेत्याला आपल्या ताब्यात ठेवले आहे. त्यांच्यासह अन्य काही बंदिवानांना जिहादींनी मुक्त करावे, यासाठी सरकारने जिहादींना सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
सोमालिया सिस्से या नेत्याला मार्चमध्ये दहशतवाद्यांनी पकडून नेले होते. त्यानंतर त्यांनी माली सरकारशी बंदिवानांच्या सुटकेसाठी बोलणी सुरू केली होती. यानंतर, गेल्या शनिवारी सरकारने ७० जिहादींना आणि रविवारी ११० जिहादींना मुक्त केले. एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर याबाबत माहिती दिली.
सिस्से हे तीन वेळा अध्यक्षपदासाठी उभे राहिले होते, मात्र तीनही वेळा पडले. १९९३ ते २०००पर्यंत त्यांनी देशाचे अर्थमंत्री म्हणून कामकाज पाहिले आहे. ज्यावेळी त्यांना जिहादींनी ताब्यात घेतले, तेव्हा ते टिम्बकटूमधील आपल्या प्रचार रॅलीमध्ये होते. यावेळी त्यांच्या वाहनावर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आल्यामुळे ते जखमीही झाले होते. यानंतर त्यांची प्रकृती कशी आहे, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
हेही वाचा : मानवी हक्क उल्लंघनाच्या आरोपाने पाक अस्वस्थ, इम्रान खान यांचा तरुणांना पुस्तके वाचण्याचा सल्ला