नाशिक - एक नाही दोन नाही तर तब्बल ४ तरुणांशी लग्न करून एका २२ वर्षीय तरुणीने ४ तरुणांच्या कुटुंबाला लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. मनमाड येथे हा प्रकार उघडकीस आलाय. याबाबत तरुणीच्या आई वडीलांसोबत मनमाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुरुषांनी एकापेक्षा जास्त लग्न केल्याच्या अनेक घटना नेहमीच ऐकायला येत असतात. मात्र, एका तरुणीने घटस्फोट न घेता चक्क ४ लग्न करून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पैशांच्या लालसेपोटी तिने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांनी या तरुणीसह आई-वडिलांनी लग्न जुळून देणारी एक महिला आणि पुरुष, अशा ५ जणांना ताब्यात घेतले आहे. या टोळीने आणखी किती जणांची फसवणूक केली याचा तपास ही पोलिस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनमाड येथील संभाजी नगर भागात राहणारे अशोक डोंगरे यांच्या मुलाला मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरू असताना त्याची ओळख पूजा गुळे राहणार अहमदपूर, लातूर या महिलेशी झाली. तिने लातूर जिल्ह्यातील अहमदपूर बंडू बेंद्रे यांची मुलगी ज्योतीबद्दल माहिती दिली. मुलगी शिकलेली आणि सुंदर आहे. मात्र, बेंद्रे कुटुंबीय गरीब असल्याने त्यांच्याकडे लग्न करण्यासाठी पैसे नाही. सर्व खर्च तुम्हाला करावे लागेल. शिवाय त्यांना मदतही करावी लागेल, असे सांगितले.
त्यानंतर डोंगरे दांपत्य मुलगा सोबत घेऊन अहमदपूरला गेले. त्यांना मुलगी पसंत पडली. १२ मे रोजी लग्नसोहळा पार पडला. लग्नाच्या आधी डोंगरे यांनी ज्योतीच्या आई-वडिलांना ४० हजार रुपये रोख दिले. तसेच सुनेच्या अंगावर ५० हजार रुपयांचे दागिने घातले. ज्योती काही दिवस येथे राहिल्यानंतर माहेरी गेली. त्यानंतर ती परत आलीच नाही. वारंवार प्रयत्न करून देखील ज्योती येत नसल्याने पाहून डोंगरे यांनी तिच्याबद्दल माहिती काढली. ज्योतीचे या आधी ३ लग्न झाले असून चौथे लग्न तिने त्यांच्या मुलासोबत केल्याचे कळाल्याने त्यांना मोठा धक्का बसला.
आपल्या मुलाची नव्हे तर या टोळीने अनेकांची फसवणूक करून त्यांना लुबाडल्याचे अशोक डोंगरे यांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन सर्व घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी ज्योती सोबत तिची आई विमल बेंद्रे, वडील बंडू बेंद्रे, त्यांचे लग्न लावून देणारी पूजा गुळे, विठ्ठल मुंडे यांच्याविरोधात ४२०, ४९४, ५९५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.