मुंबई : 'सूर लागू दे'चा टिझर खऱ्या अर्थाने चित्रपटाची तोंडओळख करून देणारा आहेच, पण त्या जोडीला उत्कंठाही वाढवणारा आहे. या चित्रपटात दिग्दर्शकाला नेमके काय सांगायचे आहे याबाबत कुतूहल निर्माण करणाऱ्या टिझरचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुख्य भूमिकेतील राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते विक्रम गोखले आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये या दोन दिग्गजांची जुगलबंदी यात पहायला मिळणार असल्याचे टिझरवरून जाणवते. मालिकांसोबतच मराठी चित्रपटांमध्येही लोकप्रिय असलेली अभिनेत्री रीना मधुकरने साकारलेल्या कॅरेक्टरचीही झलक टिझरमध्ये आहे. 'कलियों का चमन...' फेम मेघना नायडू या चित्रपटात एका सरप्राईज पॅकेजच्या रूपात दिसणार आहे. 'सूर लागू दे' या चित्रपटाचे लेखन आशिष देव यांनी केले असून, संगीत पंकज पडघन यांनी दिले आहे.
सुहासिनी मुळ्ये यांनी केले आवाहन : टिझर लाँच सोहळ्यात व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करताना सुहासिनी मुळ्ये म्हणाल्या की, 'सूर लागू दे' ही नातेसंबंधांची गोड कथा आहे. एक महान आणि अतिशय प्रिय कलाकार विक्रम गोखले यांचा दुर्दैवाने हा शेवटचा सिनेमा ठरणार आहे. या सिनेमाचे शेवटचे शेड्यूल सुरू होण्यापूर्वी विक्रमजींनी मला फोन केला. ते म्हणाले की, मला माझे कुठलेही काम अर्धवट सोडायचे नाही. त्या नाजूक परिस्थितीतही त्यांनी १४-१४ तास काम करून 'सूर लागू दे'चे शूटिंग पूर्ण केले. हा चित्रपट प्रेक्षकांनी फक्त विक्रमजींसाठी बघू नये असे मला वाटते. त्यांचे गोड-उत्कृष्ट काम आणि अतिशय चांगली गोष्ट असल्यानेही हा चित्रपट बघावा. असे आवाहनही सुहासिनी मुळ्ये यांनी केले.
चित्रपट बऱ्याच अर्थांनी वेगळा आहे : 'सूर लागू दे' हा चित्रपट एक महत्त्वपूर्ण संदेश जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार असल्याची भावना मेघना नायडूने व्यक्त केली. मेघना म्हणाली की, मराठी चित्रपट आज सिनेमहोत्सवांसोबतच पुरस्कार सोहळ्यांमध्येही बाजी मारत आहेत. 'सूर लागू दे' हा चित्रपटही त्याच पठडीतील असून समाजात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब दाखवणारा आहे. एक व्यक्ती आयुष्याच्या संध्याकाळीही कशाप्रकारे संघर्ष करते जीवनातील सप्तसूर छेडणारा असल्याचे सांगत रीना म्हणाली की, हा चित्रपट बऱ्याच अर्थांनी वेगळा आहे. विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळ्येंसारख्या मातब्बर कलाकारांसोबत काम करताना त्यांच्याकडून महत्त्वाच्या गोष्टी शिकण्याची संधी या निमित्ताने मिळाली. निर्माते अभिषेक 'किंग' कुमार आणि नितीन उपाध्याय यांनी ऑडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली 'सूर लागू दे' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. पिकल एंटरटेन्मेंटचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांनी वितरणाची जबाबदारी स्वीकारली आहे.