मुंबई: आशयघन चित्रपटांसाठी मराठी सिनेमा ओळखला जातो. इथे अतिशय वैविध्यपूर्ण आणि नावीन्यपूर्ण कथानकांना मूर्त रूप दिले जाते. सामाजिक समस्यांवर भाष्य करणारे अनेक चित्रपट येऊन गेलेत आणि त्याच पठडीतील अजून एक चित्रपट येऊ घातलाय तो म्हणजे गैरी. आदिवासी समाजातील डॉक्टर होऊ पाहणाऱ्या एका तरुणाची गोष्ट 'गैरी'मधून (Gauri Movie) मांडण्यात आली असून यात मयुरेश पेम (Mayuresh Pem) आणि नम्रता गायकवाड (Namrata Gayakwad) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
आदिवासी समाजाच्या समस्या: उत्तम स्टारकास्ट असलेल्या आणि आदिवासींच्या समस्या मांडणाऱ्या आगामी 'गैरी' या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. आदिवासी समाजातील एका डॉक्टर होऊ पाहणाऱ्या तरुणाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या समस्या (problems of tribal society) 'गैरी' हा चित्रपट मांडतो. चित्रपटाच्या टीझरमधूनच चित्रपटाच्या रंजक कथेचा अंदाज बांधता येतो. त्यामुळे 'गैरी' चित्रपटाविषयी आता कुतूहल निर्माण झाले आहे.
एका तरुणाची गोष्ट: युक्ता प्रॉडक्शन्स आणि द्विजराज फिल्म्स यांची निर्मिती असलेल्या 'गैरी' या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन पांडुरंग बाबुराव जाधव यांनी केले आहे. गुरु ठाकूर आणि विष्णु थोरे यांनी गीतलेखन, अमितराज, मयुरेश केळकर यांचे संगीत दिग्दर्शन, फुलवा खामकर यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. वैशाली सावंत, अमितराज, मधुरा कुंभार, हृषिकेश शेलार यांनी गाणी गायली आहेत. तर पार्श्वसंगीत मयुरेश केळकर यांचे आहे. विनोद पाटील यांचे छायालेखन आहे. अभिनेता मयुरेश पेम, नम्रता गायकवाड, प्रणव रावराणे, आनंद इंगळे, केतन पवार, समीर खांडेकर, सुनील देव, कृतिका गायकवाड आणि देविका दफ्तरदार यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. आदिवासी समाजातील डॉक्टर होऊ पाहणाऱ्या एका तरुणाची गोष्ट 'गैरी' या चित्रपटातून 16 डिसेंबरला रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे.