मुंबई : अभिनेता सोनू सूद त्यांच्या सामाजिक कार्यासाठी नेहमीच चर्चेत असतो. आता सोनू सूद आणखी एक सामाजिक कार्य करणार आहे. आपल्या वडिलांच्या शिकवणीनुसार सोनूने समाजकार्याची कास धरली. कोरोनामध्ये लागलेल्या लॉकडाऊन कालखंडात त्याने अनेक समाजकार्य केली आहे. कोरोना महामारीच्या संकटात आपला देश सापडला असताना, त्याने पुढाकार घेऊन हजारो कामगार, जे आपल्या घरापासून लांब अडकून पडले होते, त्यांना मदत केली होती. गरीब मजदूर वर्गातील हजारोंना त्याने स्वतःच्या खर्चाने आपापल्या गावी पाठविण्याची व्यवस्था केली होती. आता देखील तो छोट्यामोठ्या प्रमाणात समाजसेवा करत असतो. अभिनयाच्या पलीकडे जाऊन नेहमीच समाजकार्यात भाग घेऊन सोनू सूद चाहते, प्रेक्षक आणि सामान्य जनतेचे मन जिंकत असतो. महामारीचा काळ निघून गेला तरीही सोनू सूदने आपल्या समाजकार्यात खंड पडू दिले नाही. त्याने सुरू केलेल्या एनजीओ मार्फत अनेकांना तो मदत करत असतो.
सोनू सूद गरीब मुलांना देणार मोफत शिक्षण: सोनू सूदने तळागाळातल्या गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था आता केली आहे. तसेच अनेक मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रम त्याच्या संस्थेतर्फे राबविले जात आहेत.आता तो मोफत कायदा प्रवेश प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याच्या तयारीत आहे. सामान्यतः स्पर्धा परीक्षांना सामोरे कसे जावे याची अनेकांना कल्पना नसते. तसेच त्यासाठी असलेले प्रशिक्षण वर्ग महागडे असतात त्यामुळे गरीब विद्यार्थी त्यापासून वंचित राहतात. ही उणीव भरून काढण्यासाठी तो विद्यार्थ्यांना राष्ट्रीय कायदा विद्यापीठांमध्ये एमएलसूएस (NLUS) प्रवेश मिळवण्यासाठी सक्षम करणार आहे. या अंतर्गत त्यांना कायदेशीर शिक्षण घेण्यास मदत केली जाणार आहे. सोनू सूदने सुरू केलेल्या संकल्प २०२३-२४ च्या माध्यमातून होणार आहे.
विद्यार्थ्यांना फायदा होणार : 'संकल्प'बद्दल बोलताना सोनू सूदने म्हटले की, 'मी समाजाच्या उपयोगी पडतो याचा मला आनंद आहे आणि कदाचित त्यासाठी देवाने माझी नेमणूक केली असावी असे मला भासत राहते. कायदा हा देश चालविण्यासाठी महत्त्वाचा असतो आणि त्याचे शास्त्रीय पद्धतीने शिक्षण घेणे गरजेचे असते. ज्यांना 'लॉ'मध्ये करिअर करायचे आहे त्यांना गाईड करण्यासाठी आम्ही व्यवस्था निर्माण केली आहे. यातून प्रशिक्षित झालेले उमेदवार नक्कीच उत्तम वकील बनतील आणि आपला देश सुरक्षित आणि सक्षम हातात येईल. महत्वाचे म्हणजे कोरोना काळात ज्यांचे नुकसान झाले आहे किंवा इडब्ल्यूएस (EWS) म्हणजेच जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात मोडतात त्यांना या प्रशिक्षणात प्राधान्य दिले जाणार आहे.' असे त्याने सांगितले आहे. सोनू सूदच्या 'संकल्प २०२३-२४' मधील मोफत कायदा प्रवेश प्रशिक्षणाचा फायदा सर्व ११वी, १२वी व पदवीधर विद्यार्थ्यांना होणार आहे.
हेही वाचा :