मुंबई - शाहरुख खानच्या पठाणनंतर आता राजकुमार संतोषी यांच्या 'गांधी गोडसे: एक युद्ध' या चित्रपटावरुन गदारोळ झाला आहे. या नव्या वादात आता राजकुमार संतोषी यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. धमक्या मिळाल्यानंतर राजकुमार संतोषी यांनी सोमवारी (23 जानेवारी) पोलिसांत तक्रार दाखल केली. राजकुमार संतोषी यांनी पोलिसांकडे स्वत:साठी अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली आहे. राजकुमार संतोषी यांनी आरोपींवर पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी करत केवळ आपल्या जीवालाच नाही तर कुटुंबाच्या जीवालाही धोका असल्याचे सांगितले.
विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांना लिहिलेल्या पत्रात राजकुमार संतोषी यांनी जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर अतिरिक्त सुरक्षेची विनंती केली. याबाबतची तक्रार राजकुमार संतोषी यांनी मुंबईचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण यांच्याकडे केली असून पोलिसांना पत्रही लिहिले आहे. पत्रात राजकुमार संतोषी यांनी सांगितले की, त्यांनी २० जानेवारीला चित्रपटाच्या टीमसोबत पत्रकार परिषद घेतली होती. ही पत्रकार परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुंबईतील अंधेरी परिसरात ही पत्रकार परिषद सुरू होती, असे संतोषी यांनी सांगितले. त्यानंतर एका गटाने तेथे येऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे चित्रपटाच्या टीमला पत्रकार परिषद मध्येच थांबवावी लागली.
चित्रपटाचे रिलीज थांबविण्याची मागणी - राजकुमार संतोषी यांनी सांगितले की, नंतर त्यांना त्यांच्या चित्रपटाचे प्रदर्शन आणि प्रमोशन थांबवण्याची धमकी देण्यात आली, अन्यथा ते चांगले होणार नाही. राजकुमार संतोषी म्हणाले की, आपण घाबरलो आहे. त्यांच्यासोबतच कुटुंबाचा जीवही धोक्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवावी आणि आरोपींवर कारवाई करावी.
'घायल', 'दामिनी' आणि 'पुकार' सारखे हिट चित्रपट बनवणाऱ्या राजकुमार संतोषी यांनी पत्रात पुढे लिहिले की, 'माझ्या आणि माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या सुरक्षेसाठी मला ताबडतोब अतिरिक्त सुरक्षा पुरवावी, अशी मी तुम्हाला विनंती करतो. अशा लोकांना मोकळे सोडले आणि त्यांच्यावर कारवाई केली नाही तर त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.
काही दिवसांपूर्वी गांधी गोडसे एक युद्धच्या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांमध्ये बसलेल्या आंदोलकांनी काळे झेंडे फडकावत 'महात्मा गांधी झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या. त्यांनी असा दावा केला की हा चित्रपट महात्मा गांधींचा वारसा कमी करतो आणि त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेचा गौरव करतो. कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले.
'गांधी गोडसे: एक युद्ध' 26 जानेवारीला रिलीज होणार आहे. चित्रपटात चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसेची भूमिका साकारत आहे, तर दीपक अंतानी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची भूमिका साकारत आहे.