मुंबई दहीहंडीच्या दिवशी दगडीचाळ २ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि अवघ्या ३ दिवसात २,०५,३४,८१४/- चा कमाल गल्ला जमवला आहे. गेला शुक्रवार दिनांक १९ ऑगस्ट २०२२ ला पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ५१,८२,७४५/- तर दुसऱ्या दिवशी ७०,४८,३७२/- आणि तिसऱ्या दिवशी चक्क ८३,०३,६९७/- चा विश्वसनीय गल्ला जमवलेला आहे. २०१५ ला आलेल्या दगडीचाळ नंतर यंदा 'दगडीचाळ २' ने यशाचा झेंडा रोवला आहे. तब्बल ७ वर्ष प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात झुंबड उडवली आहे. प्रत्येक डायलॉगवर शिट्ट्या असो किंवा टाळ्यांचा नाद असो, आख्या महाराष्ट्रात या चित्रपटाने तुफान आणले आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ २' ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
![दगडीचाळ २ चा बॉक्स ऑफिसवर डंका](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-dagdi-chawl2-earns-2crores-fitst-weekend-mhc10001_22082022170625_2208f_1661168185_1007.jpeg)
हा चित्रपट ३५० हून अधिक स्क्रीन वर दाखवला जात आहे. प्रेक्षकांचा मिळणारा तुफान प्रतिसाद खरंच थक्क करणारा ठरला आहे. 'शंभो' म्हणत आख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या मकरंद देशपांडे यांचा कमाल अभिनय, सूर्याची भूमिका साकारणारा चॉकलेट बॉय अंकुश चौधरी तर कलरफुल पूजा सावंतने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेक्षकांचा आणि समिक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून सोशल मीडियावर दगडीचाळ २ चा डंका वाजताना दिसत आहे.
![दगडीचाळ २ चा बॉक्स ऑफिसवर डंका](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-dagdi-chawl2-earns-2crores-fitst-weekend-mhc10001_22082022170625_2208f_1661168185_599.jpeg)
निर्मात्या संगीता अहिर म्हणाल्या, "प्रेक्षक आणि समिक्षकांचा भरभरून मिळणारा प्रतिसाद आणि प्रेम पाहून मन आनंदाने भरून आलं आहे. दगडीचाळ प्रमाणेच 'दगडी चाळ २' ला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. कष्टाचा चीज झाल्याच वाटत आहे. इतक्या कमी वेळात मिळालेल्या उत्तुंग यशानंतर मी निःशब्द झाले आहे. सर्व माझ्या लाडक्या प्रेक्षक वर्गाला खूप खूप धन्यवाद असेच प्रेम कायम करीत राहाल अशी आशा आहे ."
![दगडीचाळ २ चा बॉक्स ऑफिसवर डंका](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-dagdi-chawl2-earns-2crores-fitst-weekend-mhc10001_22082022170625_2208f_1661168185_148.jpeg)
दगडी चाळ ऑक्टोबर २०१५ ला दगडी चाळ नावाचा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. याला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने एकूण ३७ कोटीची कमाई करुन सर्वांना चकित केले होते. याच चित्रपटाचा सिक्वेल आता प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन करताना दिसत आहे.
हेही वाचा - सोनेल फोगटच्या निधनावर अली गोनीसह बिग बॉस 14 स्पर्धकांनी व्यक्त केला शोक