मराठी संस्कृती, भाषा आणि शिक्षण या जिव्हाळ्याच्या विषयांना ‘बालभारती’ जोडतो असे तोंडभरून कौतुक केले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. ‘बालभारती’मध्ये सिद्धार्थ जाधव, नंदिता पाटकर, आर्यन मेंघजी मध्यवर्ती भूमिकेत तर अभिजित खांडकेकरची विशेष भूमिका आहे. रवींद्र मंकणी, संजय मोने आणि उषा नाईक या ज्येष्ठ कलाकारांच्या विशेष भूमिका या चित्रपटात आहेत. ‘बालभारती’ची निर्मिती स्फीयरओरिजीन्सची तर दिग्दर्शन नितीन नंदन यांनी केलं आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘बालभारती’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून त्याचे कौतुक करीत चित्रपटाला खूप शुभेच्छा दिल्या आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी या चित्रपटाचा नुकताच प्रकाशित झालेला ट्रेलर आवडीने पहिला आणि त्यावरील आपले म्हणणे व्हिडीओ चित्रित करून दिले. त्याचबरोबर चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छाही दिल्या.
“बालभारती चित्रपटाचा ट्रेलर मी पहिला आणि मला तो खूप आवडला. हा चित्रपट मराठी संस्कृती, भाषा आणि शिक्षण या अगदी जिव्हाळ्याच्या अशा मुद्द्यांना एकत्रित जोडतो. पालकांची आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दलची कळकळ या चित्रपटात अगदी गमतीशीर पद्धतीने मांडली गेली आहे. मी ‘बालभारती’च्या संपूर्ण टीमला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो,” असे उद्गार मा. मुख्यमंत्र्यांनी या संदेशात काढले आहेत.
या ट्रेलरचे प्रकाशन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते बालदिनी म्हणजे १४ नोव्हेंबर रोजी मुंबईत झाले. त्यांनीही या चित्रपटात हाताळल्या गेलेल्या विषयासाठी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांचे कौतुक केले आहे. ‘बालभारती’ हा मराठी चित्रपट येत्या २ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. सर्वांच्या आवडीचा विषय हलक्या-फुलक्या पद्धतीने सादर केला असल्याने ‘बालभारती’बद्दल उत्सुकता लागून राहिली आहेच पण अनेक गाजलेल्या हिंदी मालिका देणाऱ्या निर्मात्याकडून या चित्रपटाची निर्मिती होत असल्यानेही मराठी चित्रपटसृष्टीत त्याबद्दल विशेष कुतूहल आहे.
'बालभारती' हा चित्रपट येत्या २ डिसेंबर ला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
हेही वाचा - रिचा चढ्ढाच्या ट्विटर वादात अक्षय कुमारची उडी, म्हणाला, "ते आहेत म्हणून आम्ही आहोत"