कोल्हापूर - जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेचा भगवा फडकला. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात महायुतिकडून लढणाऱ्या शिवसेनेला आत्तापर्यंत यशाने हुलकावणी दिली होती. पण यावेळच्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विध्यमान खासदारांना पराभूत करून दिल्ली वारी करण्यात यशस्वी ठरले आहेत. कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे गतवेळचे पराभूत उमेदवार संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडीक यांच्यावर अडीच लाखांच्या मताधिक्याने पराभव करून मागील पराभवाचे उट्टे काढले तर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यामुळे चर्चेत असलेल्या हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी जवळपास 1 लाख मतांनी विजय मिळवला.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात तुल्यबळ सामना रंगला होता. यामध्ये महाडिक यांनी 33 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. यावेळी याच दोन उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली त्यामध्ये कोण बाजी मारणार याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी सुद्धा या मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनविला होता. निवडणूक काळात त्यांनी पाच वेळा कोल्हापूर दौरा केला होता. यातून महाघाडीचे बेरजेचे राजकारण करण्यावर त्यांनी भर दिला होता. पण याच वेळी काँग्रेसचे एकमेव आमदार सतेज पाटील यांनी आमचं ठरलंय हे घोषवाक्य बनवून धनंजय महाडिक यांच्याविरोधात थेट भूमिका घेतली होती. त्यामुळे कोल्हापूर शहरात सुरुवातीपासून महाडिक विरोधाचे वारे वाहू लागले होते. या विरोधाच्या शिडात भाजप शिवसेना व महायुतीच्या मित्रपक्षांना आणखी वारे भरले होते. परीणामी मंडलिक यांचे पारडे जड भासत होते. मात्र निकालातून नेमकं काय घडणार हे लक्षवेधी बनले होते. गुरुवारी सकाळी सात वाजता मतमोजणीला येथील रमनमळा येथील शासकीय गोदाम येथे सुरुवात झाली. प्रारंभी टपाली मतदानाची मोजणी करण्यात आली. प्रारंभीची सहा मते बाद झाल्याने त्याची चर्चा होत राहिली. पहिल्याच फेरीत मंडलिक यांनी 20 हजारांचे मताधिक्य घेतले. त्यांना 41136 एव्हडी मते तर महाडीक यांना 21453 इतकी मते पडली होती. सलामीच्या फेरीतच मताधिक्य मिळाल्याने शिवसेनेत उत्साह संचारला होता. तर राष्ट्रवादीत चिंता निर्माण झाली होती. मंडलिक यांनी त्यानंतर प्रत्येक फेरीत मोठ्या प्रमाणात मताधिक्य घेणे सुरूच ठेवले. पहिल्या तीन तासात त्यांनी लाखाचा टप्पा ओलांडला. यावेळी मंडलिक यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांसह महाघाडीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरीनेच संजय मंडलिक यांच्या विजयाच्या जोरदार घोषणा दिल्या जात होत्या. गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली. पाठोपाठ कोल्हापूर शहराच्या अनेक ग्रामीण भागांतही शिवसैनिकांनी जल्लोष सुरू केला.
इकडे मतमोजणी केंद्रात सायंकाळी चार वाजता मंडलिक यांचे मताधिक्य दोन लाखांचा टप्पा ओलांडून पुढे गेले. यावेळीही फेरीगनिक त्यांच्या मताधिक्यात वाढच होत गेली. मतमोजणी संपली तेंव्हा मताधिक्याचा आलेख शिखरावर पोहोचला होता. निकालानंतर प्रतिक्रिया देताना संजय मंडलिक यांनी मतदारांनी शिवसेनेला निवडणून देऊन सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार केले असे नमूद केले. धनंजय महाडिक यांचा नामोल्लेख न करता मंडलिक यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. मतदारांनी ताठ्यात वावरणाऱ्यांची गुर्मी उतरवली असा टोला त्यांनी लगावला.
हातकणंगले
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांच्यामुळे राज्यभरात चर्चेत होता. गेल्यावेळी महायुतीच्या वतीने निवडणूक लढवून शेट्टी हे दुसऱ्यांदा लोकसभेत पोहोचले होते. महायुतीच्या तंबूतून बाहेर पडून शेट्टी यांनी महाघाडीशी जवळीक साधून निवडणूक लढवली यावेळी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले युवा नेते धैर्यशील माने होते. प्रारंभी या लढतीत राजु शेट्टी हे सहजपणे बाजी मरतील असे चित्र होते पण अखेरच्या टप्प्यात त्याला टोकाची कलाटणी मिळाली. माने यांच्यादृष्टिने अनेक घटक पथ्यावर पडली. माने यांची मराठा जात त्यावरून केलेला बहुजन समाजाच्या अस्मितेचा मुद्दा शेट्टी आणि साखर कारखानदारांशी साधलेली जवळीक आणि नवमतदारांना माने यांना दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे माने यांची बाजू अधिकाधिक भक्कम होत गेली त्याचा प्रत्यय आज मतमोजनीवेळी आला.
येथील राजाराम तलावाजवळील शासकीय गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पहिल्या फेरीचा निकाल शेट्टी यांना दिलासा देणारा ठरला. या फेरीत शेट्टी यांना 104 मतांची अल्पशी आघाडी मिळाली किंबहुना हीच त्यांची एकमेव आघाडी देणारी फेरी ठरली सलामीच्या फेरीत शेट्टी यांना 35 हजार 567 तर माने यांना 35 हजार 463 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या अस्लम सय्यद यांनी 6984 मते घेऊन आपला प्रभाव दाखवून दिला. दुसरी फेरी मात्र शेट्टी यांना धक्का देणारी होती. त्यांना 30 हजार 623 मते मिळाली. तर माने यांनी 33 हजार 820 मते मिळवून मताधिक्य खेचले. दुसऱ्या फेरीअखेर 3 हजारांहून अधिक मताधिक्य मिळविले. त्यांचा प्रत्येक फेरीला मताधिक्य वाढतच राहिले. पाचव्या फेरीवेळी माने यांना 1 लाख 80 हजार तर शेट्टी यांना 1 लाख 45 हजार मते मिळाली होती. 35 हजारांचे मताधिक्य घेतले. हाच क्रम उत्तोरोत्तर वाढत राहिला.
त्यांनतर माने यांनी विजयाच्या दिशेने कुच केल्याचे स्पष्ट जाणवले. निकालानंतर धैर्यशील माने यांनी युवा जनतेने युवा नेतृत्वाला विजयी करून आपल्या मनातील खासदार बनविण्याचे मूर्तिमंत उदाहरण घालून दिले आहे. माझ्या विजयाला सहाय्यभूत ठरलेल्या तरुणांसह समस्थ मतदारांच्या ऋणात मी आयुष्यभर राहीन. याचवेळी उत्तम लोकप्रतिनिधी कसा असतो हे कृतीतून दाखवून देईन सांगत मानेंनी शेट्टी यांच्यावर टीकेची तोफ डागली. ते म्हणाले, जनतेला गृहीत धरण्याचा त्यांचा निर्णय चुकला चूकीच्या मार्गाने जाणाऱ्या लोकप्रतिनिधींची कोणती अवस्था होते हे निकालातून मतदारांनीच दाखवून दिले आहे.