ठाणे - एकीकडे रुग्णांना रेमडेसिवीर लस आणि बेड मिळावा यासाठी नातेवाईकांना लाईन लावावी लागत असताना दुसरीकडे ठाण्यातील कोरोनाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत वेटिंग करावी लागत असल्याचे समोर आले आहे. ठाण्यात दिवसाला किमान १५ ते २० हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे ठाणे महापालिका मृत्यूचे आकडे लपवत तर नाही ना, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांवर ठाण्याच्या तीन स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिनीद्वारे अंत्यसंस्कार केले जातात. यामध्ये शहराच्या मध्यभागी असलेल्या जवाहरबाग, वागळे इस्टेट आणि कळवा येथे अगदी सुरुवातीपासून अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. यामध्ये जवाहरबाग मध्ये 4, वागळे इस्टेट मध्ये 1 तर कळवा मनिषा नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी 1 मशीन उपलब्ध आहे. जवाहरबाग स्मशानभूमीत चार मशीन असल्याने अनेक कोविड रुग्णालयात मृत्युमुखी पडलेले मृतदेह अंत्यसंस्कारासाठी याच स्मशानभूमीत येत असतात. त्यामुळे या ठिकाणी जास्त लोड येत असल्याचे येथील काम करणाऱ्या कामगारांनी सांगितले आहे.
मृत्यूचे आकडे खोटे -
एकीकडे रुग्णांना बेड, इंजेक्शनसाठी नातेवाईकांना धडपड करावी लागत असताना दुसरीकडे मृतदेहावर लवकर अंत्यसंस्कार होत नसल्याने नातेवाईकांची चांगलीच दमछाक होत असल्याचे स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे दररोज अनेक जणांचे मृत्यू होत असून महापालिकाने जाहीर केलेली आकडेवारी आणि स्मशानभूमी मधील आकडेवारीमध्ये प्रचंड तफावत दिसून येत आहे.
स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रोज मृतदेह येत आहेत. ठाणे महापालिका प्रशासन मृतांचे आकडेवारी का लपवत आहे. आम्हाला याठिकाणी धुराचा त्रास होत असून देखील पालिका प्रशासन योग्य ती पाऊले उचलत नाही.
अंत्यसंस्काराची आकडेवारी खालीलप्रमाणे -
तारीख | जवाहरबाग | वागळे इस्टेट | कळवा | महापालिका आकडेवारी |
1 एप्रिल | 10 | 4 | 5 | 5 |
2 एप्रिल | 9 | 3 | 3 | 3 |
3 एप्रिल | 15 | 3 | 3 | 5 |
4 एप्रिल | 8 | 4 | 3 | 5 |
5 एप्रिल | 12 | 4 | 5 | 5 |
6 एप्रिल | 21 | 6 | 6 | 4 |
7 एप्रिल | 18 | 4 | 7 | 5 |
8 एप्रिल | 19 | 7 | 6 | 7 |
9 एप्रिल | 16 | 6 | 5 | 6 |
10 एप्रिल | 34 | 7 | 10 | 5 |
11 एप्रिल | 28 | 4 | 10 | 7 |
दरम्यान याबद्ल ठाणे महापालिका उपायुक्त संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांनी याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. एकूणच या प्रकाराबद्दल महापालिका प्रशासन मूग गिळून गप्प असल्याचे दिसून येत आहे.