ठाणे- एक नाग बिल्डरच्या ऑफिसमध्ये तर दुसरा साप कामगाराच्या झोपडीत घुसून बसल्याने कामगारांची पळापळ झाल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही घटना कल्याण पश्चिम परिसरात विविध मानवी वस्तीत घडल्या आहेत.
कल्याण पश्चिम परिसरात झपाट्याने नागरीकरण वाढत आहे. यामुळे शेती, जंगले नष्ट करून गृह संकुले उभी राहत असल्याने बिळात राहणाऱ्या सापांनी भक्ष्य शोधण्यासाठी मानवी वस्तीकडे आपला मोर्चा वळवला आहे.
पहिल्या घटनेत कल्याण पश्चिम परिसरातील उंबर्डे गावातील रौनक सिटी या नावाने मोठे गृह संकुल उभारले जात आहे. या गृह संकुलाच्या नोंदणी कार्यालयांमध्ये आज दुपारच्या सुमारास फणा काढलेला साप पाहून येथील कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी कार्यालयाबाहेर धूम ठोकली होती. त्यानंतर सर्पमित्र दत्ता बोंबे यांना संपर्क करून कार्यालयामध्ये साप शिरल्याची माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र बोंबे यांनी घटनास्थळी येऊन या सापाला कार्यालयाच्या आत असलेल्या गार्डनमधून पकडले. साप पकडला गेल्याने कार्यालयातील कामगारांनी सुटकेचा श्वास घेतला.
हेही वाचा- ठाण्यात सापडले मगरीचे पिल्लू, वन विभागाकडून आणखी पिल्लांचा शोध सुरू
दुसऱ्या घटनेत कल्याण पश्चिम परिसरातील दुर्गाडी किल्ल्याचे ढासळलेले बुरुज दुरुस्त करण्यासाठी आलेले कामगार हे किल्ल्यावरच एका बाजूला झोपडी बांधून त्यामध्ये राहत आहेत. या झोपडीमध्ये एक कामगार महिला आज दुपारच्या सुमाराला झोपडीत स्वयंपाक बनवण्यासाठी गेली असता तिला भांड्याच्या मागे साप दिसला. या सापाला पाहताच तिने झोपडीबाहेर पळ काढला व झोपडीत साप शिरल्याची माहिती इतर कामगारांनाही दिली. त्यानंतर साइटवर असलेल्या मुकादमाने सर्पमित्र हितेशला संपर्क करून दुर्गाडी किल्ल्यावरील एका झोपडीत साप शिरल्याची माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र हितेश यांनी घटनास्थळी येऊन या सापाला पकडून प्लास्टिकच्या छोट्या बाटलीत बंद केले.
दरम्यान, मानवी वस्तीतून पकडलेल्या दोन्ही सापांना वन अधिकारी जाधव यांच्या परवानगीने जंगलात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र हितेश आणि दत्ता यांनी दिली.