नाशिक - मागील चार वर्षांपासून शाळेकडून विद्यार्थ्यांना योग्य आहार, पाणी, गणवेश साहित्य आणि इतर सुविधा मिळत नसल्याची तक्रार घेऊन सिन्नर तालुक्यातून भर उन्हात 40 किलोमीटर पायपीट करत विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास भवन गाठले आणि येथे विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील आगासखिंड येथील एकलव्य शाळा (शताब्दी इंग्लिश मीडिअम स्कूल) आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी आदिवासी विभाग या शाळेला लाखो रुपयांचे अनुदान देते. तरी देखील या शाळेतील विद्यार्थ्यांना योग्य सुविधा मिळत नाही. या शाळेत विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण तर सोडाच, पण योग्य आहार, पाणी आणि गणवेश देखील मिळत नाही. याबाबत वारंवार आदिवासी विभागाला तक्रार अर्ज करून देखील विद्यार्थ्यांच्या समस्या सुटत नसल्याने अखेर सिन्नर तालुक्यातून भर उन्हात 40 कि.मी पायपीट करत विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास भवनाबाहेर ठिय्या आंदोलन केले.
शाळेत पाणी मिळत नाही, जेवणाच्या भाजीत अळ्या निघतात, बाथरूमची सुविधा नाही, मागील चार वर्षांपासून गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळत नाही, याबाबत आम्ही अनेक वेळा तक्रारी केल्या. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. नाशिकच्या आदिवासी विकास भवनात येण्यासाठी आम्ही शाळेकडे गाडीची मागणी केली. पण, ती देखील मिळाली नाही. म्हणून आम्ही सर्व विद्यार्थी 40 किलोमीटर पायी चालत आलो, असे एका विद्यार्थ्याने सांगितले.
ही दुर्देवी घटना आहे.आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी शासन करोडो रुपये खर्च करते. तरी देखील विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण, सुविधा मिळत नाही. या शाळेतील मुलांनी 24 मार्च रोजी समस्यांबाबत अर्ज केला होता, मात्र त्यावर अधिकाऱ्यांनी काहीच कारवाई केली नाही. याचा अर्थ असा की, शाळा व्यवस्थापन आणि आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांचे लागेबांधे आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी केला.
हेही वाचा - Water Issue Nashik : महादरवाजामेट परिसरात पेयजलाचे विविध स्त्रोत उपलब्ध - प्रांताधिकारी तेजस चव्हाण