नवी मुंबई - शहरातील 44 कंटेन्मेंट झोनमध्ये 29 जूनपासून लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. हा लॉकडाऊन 7 दिवसांसाठी असणार आहे. कोरोना संसर्गाची साखळी रोखण्यासाठी शहरातील 44 कंटेन्मेंट झोनमध्ये पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. नवी मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने या 44 ठिकाणी 5 जुलैपर्यंत कडकडीत लॉकडाऊन करण्यात येणार आहे.
नवी मुंबईतील कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (शुक्रवार) वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला खासदार राजन विचारे, महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, पोलीस आयुक्त संजय कुमार, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर नवी मुंबई शहरातील 44 ठिकाणी 29 जूनपासून पुन्हा लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊन करण्यात येणाऱ्या भागामध्ये किराणा दुकाने आणि अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता बाकीचे सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.
हेही वाचा... व्हिडिओ : कोरोनाला रोखण्यात यशस्वी ठरत असलेला 'धारावी पॅटर्न' नेमका आहे तरी काय?
शहरातील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर वाढवणार...
नवी मुंबई शहरामध्ये ज्या भागात लॉकडाऊन केले जाणार आहे, त्या भागात प्रशासन घरोघरी जाऊन स्क्रिनिंग करणार आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरामध्ये व्हेंटिलेटरची संख्या देखील वाढवण्यात येणार असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे सांगितले.