ठाणे - कोरोनाच्या संकटात राज्यसरकारने आवश्यक अन्नधान्याचा पुरेसा साठा करून ठेवणे गरजेचे होते. म्हणजे आता हा साठा रिलीज करत महागाई आटोक्यात ठेवणे शक्य झाले असते. मात्र विधिमंडळाच्या सभागृहात एकमेकांची उणीदुणी काढण्याचे गौडबंगाल असल्यामुळेच महागाई वाढत असल्याचा गंभीर आरोप वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.
कल्याणमधील एआरसी कंपनीतील कामगारांनी आपल्या हक्काच्या देण्यासाठी आणि राहत्या घरावर कारवाई होऊ नये, यासाठी बेमुदत धरणे उपोषण सुरू केले. तब्बल वीस दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला आज प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेना-भाजपवर टीकेची झोड उठवली.
ठाकरे सरकारच्या मी आणि माझे कुटुंब योजनेचे उडवली खिल्ली-
महागाईने जनता हवालदिल झालेली असताना राज्य सरकारला काही देणे-घेणे नाही. मी आणि माझे कुटुंब सुरक्षित राहिले पाहिजे सर्व जनता सुरक्षित असल्याचे राज्यातील सरकारला वाटते. हीच आजची परिस्थिती असल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर घणाघाती आरोप केले. तसेच यावेळी ठाकरे सरकारच्या मी आणि माझे कुटुंब या योजनेची खिल्ली उडवताना महागाई झपाट्याने वाढत असताना सरकारला केवळ मी आणि माझे कुटूंब इतकीच चिंता आहे. जनता महागाईने होरपळून गेली. तरी मी आणि माझे कुटुंब सुरक्षित म्हणजे जनता सुरक्षित असल्याचा गोड गैरसमज राज्य सरकार करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
हेही वाचा- महिला रुग्णाला शरीरसुखाची मागणी करणारा डॉक्टर बडतर्फ