ठाणे - कल्याण-डोंबिवलीतील चारही विधानसभेच्या उमेदारीवरून युतीत सध्या धुमशान सुरू आहे. एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या मतदारसंघात, शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी शिवसेनेचे मजबूत संघटन बांधल्याने कल्याण लोकसभा हा भाजपाचा हक्काचा मतदारसंघ शिवसेनेने प्रतिष्ठेचा करत स्व:तकडे घेतला.
तेव्हापासून भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत शिवसेनेनं तबल २२ वर्ष कल्याण डोंबिवली महापालिका, अगदी स्थापनेपासून ताब्यात ठेवली. मात्र सध्या 'शिवसेनेचा बालेकिल्ला जरी असला, तरी येथील चारही विधानसभेत भाजपचा बोलबाला ' असल्याचे दिसून येत आहे. यामुळे यंदाच्याही निवडणुकीत कल्याणच्या उमेदारीवरून युतीत धुमशान पाहयला मिळणार आहे.
हेही वाचा... पवारांच्या 'हट्टा'पोटी काँग्रेसची वाताहात?
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कल्याण - डोंबिवलीत भाजपाने शिवसेनेला अस्मान दाखवले. तेव्हापासून शिवसेनेत मोठी नाराजी आहे. गेल्या वेळी ४ पैकी ३ विधानसभा मतदारसंघांत विजय मिळवून भाजप व सहयोगी अपक्ष आमदार निवडणून आणून मोठी मुसंडी मारली. आता तर लगतच्या नवी मुंबईतील गणेश नाईक यांनी भाजपचे कमळ हातात घेतल्याने भाजपचे बळ अजूनच वाढले आहे. त्यामुळे डोंबिवलीचे आमदार तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोबिवलीत झंझावात निर्माण करण्याचे मनसुबे भाजपाकडून रचले जात आहेत.
2014 विधानसभा निवडणुकीत भाजप सेनेची युती नसताना 'कल्याण पश्चिम'मधून भाजपचे नरेंद्र पवार, 'कल्याण पूर्व'तून भाजपचे सहयोगी अपक्ष गणपत गायकवाड, 'डोंबिवली'मधून भाजपाचे रविंद्र चव्हाण आणि 'कल्याण ग्रामीण'मधून शिवसेनेचे सुभाष भोईर विद्यमान आमदार आहेत.
कल्याण पश्चिममध्ये तिरंगी सामना
कल्याण पश्चिम मधून २००९ मध्ये मनसेचे प्रकाश भोईर आमदार म्हणून निवडून आले. त्यांनतर २०१४ मध्ये भाजप-सेनेची युती तुटल्याने भाजपकडून नरेंद्र पवार, सेनेकडून बंड्या उर्फ विजय साळवी तर पुन्हा आमदार होण्याचे स्वप्न पाहून मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनीही निवडणूक लढवली. मात्र भाजपच्या नरेंद्र पवार यांनी मनसे-सेनेला धोबी पछाड देत बाजी मारली. यंदाच्या निवडणुकीत कल्याण पश्चिमेत भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांच्यासह नगरसेवक संदीप गायकर, नगरसेवक वरुण पाटील, साधना रवी गायकर, वैशाली पाटील, महेश जोशी, अर्जुन म्हात्रे, साईनाथ तरे, नगरसेवक अर्जुन भोईर, डॉ. चंद्रशेखर तांबडे असे तब्बल १० जण इच्छुक आहेत. हा मतदार संघ शिवसेनेला देण्यात यावा अशी सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळीच शिवसेनेने कल्याण पश्चिमेवर दावा सांगितला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे पदाधिकारी साईनाथ तरे यांनी मुलाखतीला हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला जातो की भाजपला? तसेच इच्छूकांची संख्याही अधिक असल्याने विद्यमान आमदारांनाच उमेदवारी दिली जाते की पक्षनेतृत्व काही वेगळा विचार करते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
हेही वाचा... पक्षांतराचे पर्व... युतीत आले आघाडीचे 'साखर सम्राट' सर्व!
कल्याण पूर्व भाजपमय, मात्र सेनेचे कडवे आव्हान
कल्याण पूर्वेतून अपक्ष आमदार गणपत गायकवाड हे सलग दोन वेळा निवडून आले आहेत. २००९ च्या पहिल्या टर्ममध्ये ते आघाडीसोबत होते. २०१४ च्या निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी भाजपला पाठींबा दिला आहे. भाजपचे सहयोगी आमदार म्हणूनच ओळखले जातात. गायकवाड यांना शिवसेनेत खेचण्यासाठी सेनेच्या नेतृत्चाकडून प्रयत्न करण्यात आले होते. मात्र कल्याण पूर्व हा जागा वाटपात शिवसेनेला कि भाजपला जातो याबाबत संभ्रम आहे. मात्र गायकवाड हे भाजपच्या मुलाखतीत हजर राहून त्यांनी इच्छूकता दर्शवल्याने कल्याण पूर्वेतून गायकवाड हे भाजपचे उमेदवार असणार हे स्पष्ट झाले. आमदार गायकवाड यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
कल्याण पूर्वतून यावेळी आमदार गायकवाड, विष्णू गायकवाड, हर्षल साळवी असे तीन जण इच्छूक आहेत. त्यामुळे हा मतदार संघ भाजपच्या वाटयाला जाणार हे जवळपास निश्चितच समजले जात आहे. तर गेल्या निवडणुकीत अवघ्या ७४५ मतांनी शिवसेनेचे गोपाळ लांडगे यांना पराभव पत्करावा लागला होता. कल्याण पूर्वेतून लांडगे हे सुध्दा इच्छुक आहेत. मात्र युती होणार की नाही, याचीच आतुरता सगळ्यांना लागलेलीआहे. युती झाल्यास शिवसेना काय निर्णय घेते, हेसुध्दा पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा... भाजपच्या ‘दृष्टीपत्रावर' एक दृष्टीक्षेप..!
डोंबिवलीत भाजपाला द्यावी लागेल शिवसेनेसह मनसेशी कडवी झुंज
डोंबिवली मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. ते यंदाच्या निवडणुकीत हॅटट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. तर यंदा मनसेही आक्रमक झाल्याने भाजपाला शिवसेनेसह मनसेशी कडवी झुंज द्यावी लागणार आहे.
प्रत्येक निवडणुकीत चव्हाण यांना भाजपमधील एका गटाचा छुप्या पध्दतीने विरोध असतो. पण तो उघडपणे कधीच केला जात नाही. तरीसुद्धा चव्हाण हे बाजी मारत आले आहेत. डोंबिवलीत मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीत युतीच्या पारड्यात १ लाख ४३ हजार मते पडली आहेत. तर आघाडीला अवघी १९ हजार मते मिळाली आहेत. चव्हाण यांच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. त्यामुळे त्यांचा सामना कोणाशी होतो हेच पाहावे लागणार आहे.
हेही वाचा... हवशे-गवशांचा महापूर..! सिध्दू'अण्णा विरुध्द सचिन'दादा' काँटे की टक्कर?
शिवसेनेच्या कल्याण ग्रामीणवर भाजपचा डोळा
कल्याण ग्रामीण मतदारसंघात दिवा आणि २७ गावे आदी ग्रामीण परिसर येत असला तरी डोंबिवली शहराचा काही भाग येतो. या मतदारसंघात शिवसेनेची ताकद असली तरी स्थानिक आमदार सुभाष भोईर यांच्या कामाविषयी मात्र फारसे समाधानकारक चित्र नाही. त्यातच यंदाच्या निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघावर भाजपचाही डोळा आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत युतीला १ लाख २६ हजार मते मिळाली तर आघाडीच्या पारड्यात ४३ हजार ८६९ मते पडली आहेत. शिवसेनेतही अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात आहेत. सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी उमेदवारी मागितली आहे. मात्र विद्यमान आमदाचे तिकीट कापणे इतके शक्य नाही, असेही बोलले जाते. भोईर यांना मुंब्रा कळवा येथे उमेदवारी देण्यासाठी सेनेचा एक गट सक्रीय असल्याचेही समजते. त्यामुळे कल्याण ग्रामीणमध्ये उमेदवारीवरून सेनेत चांगलीच खंडाजंगी होणार असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा... आघाडीचं ठरलं, युतीचं काय...?
कल्याण डोंबिवलीत २ खासदार, ४ आमदार व सुमारे १०० नगरसेवक सेना भाजपचे आहेत. त्यातच राज्यात व केंद्रात भाजापचीच सत्ता आहे. मात्र गेल्या ५ वर्षात कल्याण डोंबिवलीत सेना – भाजप युतीचे एकमेकांशी कधीही जमले नाही. शहराच्या विकासाच्या महत्वाच्या विषयावर सेना भाजपचे आमदार, खासदार व मंत्री एकत्र आले आणि त्यांनी एखादा प्रश्न सोडविलाय, असे कल्याण डोंबिवलीकरांना दिसले नाही. याउलट एखादा प्रकल्प वा योजनेची मंजुरी नव्हे तर नुसती घोषणा जरी झाली तरी त्याचे श्रेय घेण्यासाठी सेना भाजपमध्ये चढाओढ लागत असे. शह काटशह आणि एकमेकांवर कुरघोडी करण्यातच युतीची पाच वर्षे गेली. त्यामुळे शहरातील समस्यांची स्थिती जैसे थी वैसे आहे.
अनधिकृत बांधकामांची नगरी, प्रदूषित नगरी, खड्ड्यांची नगरी, अस्वच्छ शहर, वाहतूक कोंडीचा बालेकिल्ला अशी विशेषणे येथील नागरिकच सध्या निराशेपोटी लावत आहेत. शिवसेना-भाजपतील युतीची चर्चा सुरू असली, तरी कल्याण - डोंबिवलीत चारही मतदारसंघांत दोन्ही पक्षांतील इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे युती झाली, तरी मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे युती झाली नाही तर मोठ्या प्रमाणात पक्षांतर होण्याचीही शक्यता आहे.