ठाणे - कचरा उचलण्यास नकार देऊन नागरिकांची खिल्ली उडवल्याने संतापलेल्या विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी कचरा कुंडीत जमा झालेला कचरा दुचाकीवरुन नेऊन ठेकेदाराच्या कार्यालयात टाकला. दरम्यान, ठाणे महानगर पालिकेमध्ये कचर्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. हा भ्रष्टाचार उघडकीस आणणार असून ही समस्या निकाली न लावल्यास अधिकार्यांच्या दालनात कचरा टाकू, असा इशारा शानू पठाण यांनी दिला.
मुंब्रा येथे अभिषेक कंस्ट्रक्शन व अमृत इंटरप्रायझेस या दोन कंपन्यांना कचरा उचलण्याचा ठेका देण्यात आलेला आहे. मात्र, या कंपन्यांचे कर्मचारी स्वत:ला सोयीचा होईल, असाच कचरा उचलत असतात. किस्मत कॉलनी आणि दारुल फलाड परिसरात कचर्यातील लाकूड व गाद्या न उचलता ते कुंडीत किंवा आजूबाजूला फेकून देत असतात. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असते. या संदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही कचरा उचलण्यात येत नव्हता. त्यामुळे येथील नागरिकांनी विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांच्याकडे तक्रार केली होती. या संदर्भात शानू पठाण यांच्यासमोरच दूरध्वनीवरुन अभिषेक इंटरप्रायझेच्या कार्यालयात संपर्क साधण्यात आला. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्यांनी कचरा उचलण्यास तर नकार दिलाच शिवाय, तक्रार करणार्यांची खिल्ली उडविली. त्यामुळे संतापलेल्या शानू पठाण यांनी सकाळी 10 वाजेच्या सुमारास थेट किस्मत कॉलनी परिसर गाठला. त्या ठिकाणी अमृत इंटरप्रायझेस या कंपनीच्या मालकीची (एम एच 04 बी यू 9811) कचर्याची गाडी उभी होती. या गाडीतील कर्मचारी कचरा उचलत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर शानू पठाण व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हाच कचरा गोणींमध्ये भरुन दुचाकीवरुन रेतीबंदर येथील अमृत इंटरप्रायझेस व अभिषेक कंस्ट्रक्शनच्या कार्यालयात नेऊन ओतला.
कर्मचारी संख्या कागदावरच
ठेकेदारांकडील कर्मचार्यांची संख्या 25 टक्क्याने कमी असल्याच्या तक्रारी आहेत. निविदा मंजूर करताना जी कर्मचारी संख्या नमूद करण्यात आलेली असते. त्यापेक्षा 25 टक्के संख्या नेहमीच कमी असते. तसेच, खासगी कचरा असा नवा शोध या ठेकेदारांनी लावला आहे. खासगी कचरा म्हणजे नक्की काय, याचे स्पष्टीकरण अधिकार्यांनी करावे, अशी सूचना करुन, कचर्याच्या बाबतीत ठाणे महानगर पालिकेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. ठाणे पालिकेतील अधिकार्यांना मलिदा मिळत असल्याने ते अशा ठेकेदारांवर कारवाई करत नाहीत. आता आपण या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार असून कचरा उचलण्याची ही चुकीची पद्धत संपुष्टात न आल्यास घनकचरा व्यवस्थापनाच्या अधिकार्यांच्या दालनात नेऊन आपण कचरा फेकणार असल्याचा इशाराही यावेळी शानू पठाण यांनी दिला.
हेही वाचा - खळबळजनक! चहाच्या उधारीवरुन भांडणात मध्यस्थी करणाऱ्यावर तलवारीने हल्ला