ठाणे - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय आता पूर्णतः कोव्हिड-19 साठीचे रुग्णालय म्हणून घोषीत करण्यात आले आहे. मात्र, याचा धसका रुग्णालय परिसरातील अनेक वस्त्यांनी घेतला आहे. कोरोना संशयित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमुळे कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी जिल्हा रुग्णालयासमोरील पिंपळपाडयात जाणारा रस्ता स्थानिक रहिवास्यांनी रहदारीसाठी बंद केला आहे.
हेही वाचा... ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 93 वर, सर्वत्र चिंतेचे वातावरण
ठाणे जिल्हा रुग्णालय आता कोविड-19 साठीच...
ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील कोरोना संशयित रुग्णांना उपचारासाठी यापूर्वी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात येते होते. त्यामुळे रुग्णांचे हाल होत होते. ही बाब लक्षात घेऊन तसेच जिल्ह्यात आढळून येणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णावर तात्काळ उपचार करता यावे. कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका टाळता यावा, यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय हे पूर्णतः कोविड-19 साठीचे रुग्णालय म्हणून घोषीत करण्यात आले असून या रुग्णालयात केवळ कोरोनाचे रुग्ण तपासण्यात येणार आहे.
ठाणे जिल्ह्यासह पालघर जिल्ह्यातील रुग्णांच्या उपचारासाठी ठाण्यातील टेंभी नाक्यानजीक ठाणे जिल्हा रुग्णालय हे नागरिकांसाठी आधार मानले जाते. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरच पिंपळपाडा आणि जुनी पोलीस लाईन ही वसाहत आहे. मात्र, शनिवारपासुन जिल्हा सामान्य रुग्णालय हे पूर्णतः कोविड-19 साठी उपचार केंद्र असणार त्यामुळे रुग्णालय परिसरातील अनेक वस्त्यांनी याची धास्ती घेतली आहे. त्यातच रुग्णालयात 27 कोरोना संशयित रुग्ण दाखल केले असल्याने रुग्णालयासमोरील पिंपळपाडा परिसरातील नागरिकांनी तिथे अन्य नागरिकांस प्रवेश बंद केला आहे.