ठाणे - तौक्ते चक्रीवादळाचा फटका ठाणे शहराला देखील मोठ्या प्रमाणात बसलेला पाहायला मिळाला होता. त्यादरम्यान ठाण्यात अनेक ठिकाणी मोठ-मोठी झाडे पडून नुकसान झाले होते. तसेच झाडांच्या फांद्या पडल्याने अनेक ठिकाणी कचरा जमा झालेला आहे. मात्र दोन दिवस उलटून देखील महापालिका प्रशासन आणि वृक्ष प्राधिकरणाला पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावण्याचा विसर पडल्याने मनसेच्या वतीने आज रस्त्यांवर पडलेली झाडे आणि त्यामुळे साचलेल्या कचऱ्यात बसून आंदोलन करावे लागले आहे. मनसेचे ठाणे विभाग प्रमुख महेश कदम यांनी कचऱ्यात बसून ठिय्या आंदोलन केले.
'वृक्ष प्राधिकरण विभाग बरखास्त करा'
कोरोना संकट सुरू असताना चक्रीवादळासारखे मोठे संकट आपल्यावर आले आणि त्यात ठाणे शहरात ठिक ठिकाणी घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरले. यामुळे मोठी रोगराई टाळता येणार नाही, लोकांच्या जीवाशी खेळू नका, अशी विनंती करत वृक्ष प्राधिकरण विभाग हा भ्रष्टाचाराने भरलेला आहे हा विभाग बरखास्त करा, अशी मागणी करत मनसेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे.
हेही वाचा - तौक्ते वादळामुळे पडलेली झाडे अल्पावधीत हटवल्याचा पालिकेचा दावा