ठाणे - गणेश नाईक राष्ट्रवादी सोडणार हे 2014 मध्येच ठरले होते. वारंवार पक्षाला सांगूनही पक्षाने नेहमी नाईकांना वरची बाजू दिली. परंतु मागील पाच वर्षात नाईकांनी राष्ट्रवादी संपवली आणि आज पक्ष अडचणीत असताना पक्षाला उभारी देण्याऐवजी ते आपला स्वार्थ साधण्याचे काम करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
मागील काही दिवसांपासून नाईक कुटुंब हे भाजपमध्ये जाणार याची चर्चा सुरू होती. त्यानंतर मंगळवारी संदीप नाईक यांनी आपला राजीनामा दिला आणि सुरू असलेल्या या चर्चांना पूर्णविराम लागला. यावर आव्हाडांनी नाराजी व्यक्त केली. नाईकांच्या या निर्णयाविरोधात बोलताना ते भाऊक झाल्याचे दिसून आले.
नाईक हे बंधुतुल्य सहकारी ते कधीही गद्दारी करणार नाही असे पवार साहेब बोलायचे
गणेश नाईक यांनी पध्दतशीरपणे राष्ट्रवादी संपवण्याचे काम केले आहे. या संदर्भात मी वारंवार पक्षाला याची माहिती देत होतो, मात्र माझे दुर्देव असे की माझ्यावर किंवा माझ्या बोलण्यावर पक्षाने विश्वास ठेवला नाही. याउलट नाईक यांना नेहमीच वरची बाजू पक्षाने दिली. 2014 मध्येच नाईक भाजपमध्ये जाणार होती. परंतु पवार साहेबांनी नाईक हे आपले बंधुतुल्य सहकारी असल्याचे सांगत ते कधीही गद्दारी करणार नाहीत, असे बोलले होते. मात्र, नाईकांनी मागील पाच वर्षात राष्ट्रवादीला खड्यात घालण्याचे काम केले.
नाईकांनी राष्ट्रवादीला संपविण्याचा विडाच उचलला होता
कल्याण डोंबिवलीत सत्ता असताना आज त्या ठिकाणी एकही नगरसेवक नाही. हीच परिस्थिती भिवंडी आणि मिराभाईंदरमध्येही आहे. या सर्वांचे नेतृत्व नाईकच करीत होते. घरी बसून पक्ष चालत नाही, हे त्यांना समजायला हवे होते. मात्र, राष्ट्रवादीला संपविण्याचा विडाच त्यांनी उचलला होता, असा आरोपही आव्हाडांनी केला आहे.
नाईकांचा स्वाभीमान आता कुठे गेला ?
स्वाभिमानाच्या गप्पा मारणाऱ्या गणेश नाईक यांच्या विरोधात मंदा म्हात्रे वाट्टेल ते बोलत आहेत. भाजपचे अध्यक्ष नाईक यांना आम्ही स्विकारणार नाही असे बोलत आहेत, असे असतानाही नाईक भाजपात जात आहेत. त्यामुळे नाईकांचा स्वाभीमान आता कुठे गेला ? असा सवालही आव्हाडांनी उपस्थित केला आहे.
सत्ता काळात नाईकांनी आपल्या घराच्यांचा अधिक विकास केला
राष्ट्रवादी पक्षाने नाईक कुटुंबाला अख्खी नवी मुंबई दिली होती. सर्व महत्वाची पदे त्यांच्या घरात होती, असे असतानाही त्यांनी गद्दारी केली. नवी मुंबईचा विकास झाला, हे जरी मान्य केले तरी त्यात नाईकांनी आपल्या घराच्यांचाच विकास अधिक केला, असा गंभीर आरोपही आव्हाडांनी यावेळी केला आहे.
आमचा पक्ष आम्ही पुन्हा एकदा उभा करु
या सर्व गोष्टी मला उघडय़ा डोळ्यांनी दिसत होत्या. मात्र पक्षाकडूनच याची दखल घेतली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केले. मात्र आता हा पक्ष पुन्हा एकदा उभा करु आणि त्याची सुरवात नवी मुंबईतूनच करु असा विश्वास आव्हाडांनी शेवटी बोलताना व्यक्त केला आहे.