ठाणे - दीड वर्षाच्या चिमुरडीसाठी चुकीची औषधे लिहून देऊन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोन डॉक्टरांविरोधात कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. डॉ. मोहम्मद ताज अन्सारी (वय ४५) डॉ.एस.एम. आलम (वय ५७) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांची नावे आहेत.
हेही वाचा - भिवंडीत अग्नितांडव सुरूच; गोदामाच्या छतावरील भंगाराला भीषण आग
उपचार सुरू असतानाच चिमुरडीचा मृत्यू
कल्याण पूर्वेतील गोविंदवाडी परिसरात मुन्नी सहानी या कुटुंबासह राहतात. तर, याच भागात गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांचे हसन नावाने क्लिनिक आहे. मुन्नी सहानी यांची लहान मुलगी नेहा आजारी असल्याने ५ जुलै रोजी दुपारच्या सुमारास त्या तिला हसन क्लिनिकमध्ये उपचारासाठी घेऊन गेल्या. त्यावेळी तिची तपासणी करून डॉक्टर मोहम्मद अन्सारी यांनी डॉ. आलम यांच्या लेटरहेडवर नेहाला औषधे लिहून देत त्या औषधींचे चिमुरडीला सेवन करण्यास तिच्या आईला सांगितले. मात्र, त्या औषधींचे सेवन केल्याने नेहाची प्रकृती अधिक गंभीर झाली होती. त्यामुळे, पुन्हा ६ जुलै रोजी नेहाची आई तिला हसन क्लिनिकमधील डॉक्टरकडे घेऊन गेली. मात्र, त्याच दिवशी सांयकाळच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.
न्यायासाठी आदी पोलीस ठाण्यात धाव नंतर न्यायालयात
नेहाच्या आईने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगत डॉक्टरवर कारवाईची मागणी केली होती. मात्र, त्यावेळी पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नसल्याचे दिसून आल्याने नेहाच्या आईने कल्याण न्यायालयात अर्ज सादर करून डॉक्टर विरोधात कारवाईची मागणी केली होती. यावरून न्यायालयाने संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही डॉक्टरांविरोधात भादंवीच्या कलम ३०४, ४०६, ३४ सह महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ चे कलम ३३ (२), ३३ (अ) ३६ प्रमाणे गुन्हा दाखल केल्याची माहिती तपास अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक डी.ई. गोडे यांनी दिली. तसेच, तपास सुरू केला असून तपासाअंती दोषी डॉक्टरला अटक करण्यात येणार असल्याचेही सांगितले.
हेही वाचा - ठाणे शहरात राबविण्यात आलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील गैरव्यवहारांची होणार चौकशी