ठाणे - उल्हासनगरमधील एका बांधकाम व्यवसायकाकडून खंडणी घेताना एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली. व्यवसायिकाच्या कार्यालयात हा खंडणी बहाद्दर माहिती अधिकार कार्यकर्ता ४० हजारांची खंडणी घेत होता. हा सर्व प्रसंग सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या कार्यकर्त्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश खटवानी (वय, २९ रा. प्रेमटेकडी, उल्हासनगर ) असे खंडणी बहाद्दर माहिती अधिकार कार्यकर्त्याचे नाव आहे.
हेही वाचा... कामगारांच्या देशव्यापी संपाला शिवसेनेचा पाठिंबा
राजेंद्र श्रीखंडे या व्यवसायिकाचे उल्हासनगरमधील अयोध्यानगर येथे जयभोले कन्स्ट्रक्शनचे कार्यालय आहे. श्रीखंडे यांनी महापालिकेची परवानगी घेऊन इमारतीचे बांधकाम केले. मात्र, परवानगी व्यतिरिक्त वाढीव बांधकाम केल्याने खटवानी याने त्यासंदर्भात पालिकेच्या नगररचना विभागात माहिती अधिकारा अंतर्गत अर्ज दाखल करून माहिती मागवली. त्या माहितीच्या आधारे नितेश खटवानी याने तक्रार दाखल केली होती. हीच तक्रार मागे घेण्यासाठी त्याने राजेंद्र श्रीखंडे यांचेकडे १ लाखांची खंडणी मागितली होती. मात्र तडजोडी अंती ४० हजार रुपये देण्याचे ठरले होते.
हेही वाचा... चीनचा दक्षिण आफ्रिकेतील बाजारपेठेवर डोळा; 'अशी' आहे भारताशी कट्टर स्पर्धा
राजेंद्र श्रीखंडे यांनी ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे नितेशची तक्रार दाखल केली होती. त्यातच नितेश ४० हजार रुपये घेण्यासाठी अयोध्यानगर येथील शिवसेना शाखेच्या शेजारी जयभोले कन्स्ट्रक्शन कार्यालयात शुक्रवारी रात्रीच्या सुमाराला आला होता. त्यावेळी आधीच सापळा लावून बसलेल्या खंडणी विरोधी पथकाच्या जाळ्यात तो अलगद अडकला. विशेष म्हणजे खंडणी घेतानाचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून नितेशने श्रीखंडे यांना गुंडाकडून ठार मारण्याचीही धमकी दिली होती.
हेही वाचा... मध्यपूर्वेतील तणावाने पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुच
हा खंडणी बहाद्दर माहिती अधिकार कार्यकर्ता नितेश खटवानी एका साप्ताहिकाचा संपादक असल्याचे समोर आले आहे. त्याने यापूर्वीही अनेक जणांकडून खंडणी स्वीकारल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. त्याला न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांनी दिली. अधिक तपास ठाणे खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आर. एस. कदम करत आहेत.