ठाणे - नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे शहरात नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या क्वारंटाईन सेंटर्सची पाहणी केली. यावेळी त्यांनी न्यू होरायझन स्कूल येथे कोरोना कोव्हिड 19ची लक्षणे नसलेल्या बाधित रूग्णांसाठी निर्माण करण्यात आलेल्या सेंटर्सचीही पाहणी करुन आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत महापालिका आयुक्त विजय सिंघल होते.
प्रारंभी शिंदे यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयास भेट दिली. ज्ञानसाधना महाविद्यालय येथे महापालिका जवळपास 350 ते 400 खाटांची क्षमता असलेले क्वारंटाईन सेंटर उभारत आहे. या सेंटर्सची पाहणी करून त्यांनी त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांची तत्काळ पुर्तता करण्याच्या सूचना दिल्या. याठिकाणी तात्पुरती शौचालये निर्माण करून या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची गैरसौय होणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगितले.
ज्युपिटर हॉस्पिटल जवळ महापालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या पार्किंग प्लाझामध्येही जवळपास 400 खाटांची क्षमता असलेले क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येत आहे. या सेंटर्सला एकनाथ शिंदे यांनी भेट देवून या ठिकाणी बेडस, पार्टीशन, विद्युत दिवे, पंखे, शौचालय आदी मुलभूत सुविधा प्राधान्याने निर्माण करण्याच्या सूचना दिल्या.
ओवळा आनंदनगरजवळ न्यू होरायझन स्कूल येथे 1000 एसिम्टोमॅटिक कोरोनाबाधित रूग्णांसाठी सेंटर्स सुरू करण्यात आले आहे. या सेंटरला भेट देवून एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणाहून लोकांच्या तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता घेण्यास सांगितले