ठाणे - गेल्या ३६ वर्षाची परंपरा असलेल्या कल्याण पूर्वेतील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या विद्यमाने या वर्षीच्या शिवजयंती निमित्त शिवरायांना वंदन करण्यासाठी सहा हजार वृक्ष रोपांच्या माध्यमातून शिवप्रतीमेची छबी साकारण्यात आली आहे. पर्यावरणाचा संदेश देणारी शिवरायाची प्रतिमा तिसगावातील तिसाई देवी मंदीराच्या प्रांगणात शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने साकारण्यात आली आहे.
वृक्ष, रोपांचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप
गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही शिवजयंती उत्सवावर कोविडचे संकट कायम आहे. त्यामुळे १९ फेब्रुवारी रोजीच्या शिवजयंती दिनी तिसाई देवीच्या प्रांगणात शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने शिव प्रतिमेचे पुजन करण्यात आले. विशेष म्हणजे शिवरायांच्या जयंतीनंतर विविध संस्था संघटनांना शिवरायांच्या प्रतिमेला साकारायला लागलेली ६ हजार वृक्ष रोपांचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात येणार असल्याचे मंडळाचे विश्वस्त नरेंद्र सुर्यवंशी यांनी सांगितले. तर शिवरायांच्या प्रतिमेची कलाकृती प्रत्यक्ष कृतीत उतरण्यासाठी रुपेश गायकवाड हे स्वत: गेले महिनाभर आपल्या निवासस्थानी प्रायोगिक पद्धतीने सराव करत होते. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून, शिवरायांची ही कलाकृती तिसाई देवीच्या चरणी समर्पीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.