ठाणे - जिल्ह्यातील शहापूर व मुरबाड नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. मुरबाड 69.40 टक्के, तर शहापूरमध्ये 75.73 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. मुरबाडमधील ५१, तर शहापूरमधील ३६ उमेदवारांचा फैसला ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाला आहे. आता कोणाच्या पारड्यात मत पडली हे १९ जानेवारी रोजी होणाऱ्या मतमोजणी नंतरच्या निकालावरून समोर येणार आहे. मात्र, दोन्ही नगरपंचायतींमध्ये शिवसेना व भाजपने आमचाच झेंडा फडकणार असल्याचा दावा केला आहे.
हेही वाचा - Matrimonial Sites Fraud : तब्बल 41 महिलांची कोट्यवधींची फसवणूक करणारा 'लखोबा' गजाआड
केंद्रीय राज्यमंत्री पाटीलसह पालकमंत्री शिंदेंची प्रतिष्ठा पणाला
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड व शहापूर नगरपंचायतीवर एक हाती निर्विवाद सत्ता मिळवण्यासाठी भाजप शिवसेनेने येथे प्रचंड राजकीय ताकद लावली असून, कुठल्याही परिस्थितीत नगरपंचायत निवडणुकीत यश संपादन करयाचेच, यासाठी खुद्द भाजपचे केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील, भाजप आमदार किसन कथोरे, तर शिवसेनेचे राज्यातील नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील यांनी विशेष लक्ष केंद्रित केले.
ठाणे जिल्ह्यातील राजकारणातील या चार वजनदार नेत्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा अक्षरशः पणाला लावल्याने शहापूर व मुरबाड नगरपंचायतीवर शिवसेना की, भाजपा, या दोन्ही पक्षांपैकी कोण बाजी मारणार? याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. याच निवडणुकीवरून पुढील विधानसभा निवडणुकीचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.
निवडणुकीत आयाराम गयारामाचा प्रभाव
शहापूर नगरपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आहे. तर, मुरबाड भाजपच्या ताब्यात आहे. मात्र, दोन्ही नगरपंचायतीवर भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेसोबत नगरपंचायत निवडणुकीत कडवी झुंज देण्याची तयारी भाजपने केली होती. यासाठी राजकीय डावपेच आखत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी शहापूरमधील शिवसेनेतील चार नगरसेवक भाजपच्या गळाला लावले. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी व नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारीसाठी तिकिटांची झालेली कापाकापी यावरून नाराज झालेल्या शिवसेनेतील नाराजांनी ऐन नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत भाजपची वाट धरली व कमळ हाती घेत पक्षांतर केले. शिवसेनेतील या नाराजांना भाजपने उमेदवारी देऊन शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्याची राजकीय रणनीती आखली. परंतु, भाजपची ही राजकीय खेळी उलथवून टाकण्यासाठी शिवसेनेने देखील शहापूर नगरपंचायतीचा गड राखण्यासाठी भाजपचे आव्हान स्विकारले असून खुद्द या निवडणुकीकडे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे बारीक लक्ष ठेऊन आहेत. तर, केंद्रीय मंत्री कपिल पाटील व आमदार किसन कथोरे हे शहापूर व मुरबाड शहरात ठाण मांडून आहेत. दोन्ही पक्षांनी जोरदार तयारी केली असून, प्रत्येक प्रभागात शिवसेनेने प्रचारात जीव ओतला आहे.
शहापुरात तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार ?
शहापूर शहरातील एकूण ८ हजार ५८ मतदार संख्या असलेल्या १७ प्रभागांपैकी ओबीसी म्हणून ४ जागांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. १३ प्रभागांसाठी १४ मतदान केंद्रांवर नगरपंचायत निवडणुकीत ३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत मनसेने माघार घेतली असून मनसेने भाजपला पाठिंबा जाहीर केला. तर काँग्रेस फक्त १ जागा लढत आहे. या मतदारसंघात मुस्लीम अल्पसंख्याक मतदार कोणाला पसंती देणार, यावर येथील निकाल पुढे येईल. शहापूरमध्ये राष्ट्रवादीचा आमदार असूनही राष्ट्रवादी काँग्रेसने ७ ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. तर, राष्ट्रवादी पुरस्कृत माकप १ जागेवर निवडणूक लढवत आहे. यामुळे ती काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप पुढे टक्कर देऊ शकणार नाही, असे एकंदरीत चित्र दिसत आहे. या निवडणुकीत शिवसेना की भाजपची सरशी ठरणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. मात्र, राजकीय वर्तुळात प्रचंड लक्षवेधी ठरलेल्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, मतदार कोणाच्या उमेदवारांना पसंती देतील हे निकालानंतर स्पष्ट होईल. पण, सध्यातरी राजकीय गोटात उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
मुरबाडमध्ये भाजपला बसणार फटका ?
मुरबाड नगरपंचायत भाजपच्या ताब्यात आहे. या ठिकाणी १७ वॉर्ड असून, चार ओबीसी असल्याने १३ जागेसाठी ५१ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये १३ भाजप, १२ शिवसेना, राष्ट्रवादी ७, काँग्रेस ७, मनसे ३, प्रहार संघटना ३ यांच्यासह अपक्ष उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. 12 हजार 897 मतदार असून १९ मतदान केंद्रांवर आज मतदान पार पडले. या ठिकाणी शिवसेनेसह राष्ट्रवादीने भाजपला आव्हान दिले आहे. बेकायदेशीर गाळे धारकांवर सुरू असलेली कायदेशीर प्रक्रिया, बोगस बांधकामे, पाणी समस्या यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेने या भागात स्वतःचे भक्कम अस्तित्व निर्माण केले आहे.
पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख तथा हातमाग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्त्वासोबत जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या कार्यामुळे शिवसेनेला जनाधार मिळाला. सोबतच नगरपंचायतीचे बांधकाम सभापती नितीन तेलवणे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत भाजपला जय महाराष्ट्र करीत शिवसेनेत केलेला प्रवेशही सेनेसाठी जमेची बाजू ठरणार आहे. भाजपातील बंडखोरीचा फटका भाजपला बसण्याची दाट शक्यता आहे. तर, दोन्ही ठिकाणची निवडणूक शांततेत पार पाडावी, यासाठी मुरबाड व शहापूर पोलिसांनी व प्रशासकीय यंत्रणांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
हेही वाचा - चारित्र्याच्या संशयावरून भर रस्त्यात बायकोची निर्घृण हत्या; नवऱ्याचाही आत्महत्येचा प्रयत्न