सोलापूर - महापालिका परिवहन विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मागील १४ महिन्यांपासून वेतन दिले गेले नाही. १४ महिन्यांचे एकत्रित वेतन मिळावे, यासाठी परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी जूळे सोलापूरातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. पाण्याच्या टाकीवर चढून ४० तासांपेक्षा जास्त वेळ झाला असला तरी या आंदोलनात कोणताही तोडगा निघालेला नाही.
या आंदोलात काही कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडल्यामूळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महापालिका परिवहन कर्मचाऱ्यांना १४ महिन्यांचे थकीत वेतन मिळावे. यासाठी प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले. जूळे सोलापूर येथील मोठ्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू करण्यात आले. सोमवारी सकाळी कर्मचारी व प्रहार संघटनेचे कार्यकर्ते पाण्याच्या टाकीवर चढले आहेत. आंदोलक आणि परिवहनच्या प्रशासनाची बोलणी फिसकटलेली असल्यामुळे मागील ४० तासांपासून पाण्याच्या टाकीवर चढून हे आंदोलन सुरूच आहे.
थकीत वेतन मिळावे यासाठी २८ जून पासून सोलापुरातील परिवहन कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. महापालिकेचा परिवहन उपक्रम हा आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारी होऊ शकलेल्या नाहीत. प्रशासनाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासनाचा तोडगा कर्मचाऱ्यांनी मान्य केला नव्हता, त्यामुळे हे आंदोलन सुरूच आहे.