सोलापूर - कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील खासगी आणि सरकारी शाळांचे वर्ग बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षण व्यवस्था उदयास आली. मात्र, स्मार्ट फोन किंवा लॅपटॉप सर्व विद्यार्थ्यांकडे किंवा पालकांकडे असेलच याची शास्वती नाही. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी साधने नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सोलापुरातील रामवाडी येथील महानगरपालिकेच्या शाळेतील शिक्षकांनी गृहभेट आणि झाडाखाली वर्ग सुरू केले आहेत.
हेही वाचा - सकर माशामुळे उजनी धारणातील स्थानिक माशांचे आयुष्य धोक्यात, मत्स्य व्यवसायिक हैराण
गोरगरीब विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महानगरपालिकेचे शिक्षक देखील पूर्णतः प्रयत्न करत आहेत. रामवाडी येथील महानगरपालिकेच्या शाळेतील शिक्षकांनी झाडा खाली वर्ग सुरू केले आहे आणि रोजंदारीवर, तुटपुंज्या कमाईवर आपली उपजीविका चालवणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली आहे.
सेतू अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांची धावपळ
राज्य शासनाने प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रम सुरू केला आहे. सेतू अभ्यासक्रमामध्ये 45 दिवसांचा क्रॅश कोर्स शासनाने आयोजित केला आहे. यात जे विद्यार्थी पुढील वर्गात उत्तीर्ण झाले त्यांना मागील वर्षीचा सर्व अभ्यासक्रम उजळणी म्हणून 45 दिवसांत पूर्ण करावयाचा आहे. यासाठी सोलापुरातील प्रत्येक शाळेचा शिक्षक विद्यार्थ्यांची मागील वर्षातील अभ्यासक्रमाची उजळणी घेताना दिसत आहे. काहीजण ऑनलाईन उजळणी घेत आहेत, तर काही शिक्षक ऑफलाईन उजळणी घेत आहेत. मात्र, रामवाडी येथे अत्यंत गरीब लोकवस्ती वास्तव्यास आहे. या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेची मराठी, उर्दू आणि कन्नड शाळा आहे. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन किंवा लॅपटॉप हे उपकरणे नाहीत. सेतू या अभ्यासक्रमामधून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरूच रहावे यासाठी शिक्षक झटत आहेत.
झाडाखाली होतो शालेय किलबिलाट -
गेल्या दीड वर्षांपासून शाळेतील विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकायला मिळाला नाही. राज्य शासनाने शाळा सुरू करण्यास कोणतीही परवानगी दिली नाही. ऑनलाईन शिक्षणाकडे भर दिला आहे. पण, ज्यांकडे स्मार्ट फोन नाही किंवा लॅपटॉप नाही अशा विद्यार्थ्यांसाठी झाडाखाली शाळा भरत आहे. दररोज दोन तास शालेय किलबिलाट रामवाडी येथील झाडांखाली पहावयास मिळत आहे. रामवाडी येथील महानगरपालिका शिक्षकांनी गोरगरिब विद्यार्थ्यांसाठी झाडाखाली वर्ग सुरू केले आहे. या वर्गात गणित, विज्ञान, समाजशास्त्र, नागरिकशास्त्र, मराठी, इंग्रजी आदी विषयाचे धडे गिरवले जात आहे. शिक्षकांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा - आषाढी वारी सोहळा : पंढरीत 7 दिवस, तर जवळपासच्या 9 गावांत चार दिवसांची संचारबंदी