सोलापूर - 5 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीवेळी मराठा समाजाचे आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे, सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा पुढील रूपरेषा ठरवण्याबाबत बैठका घेत आहेत. आज शिवाजी प्रशाला येथे सकल मराठा समाजाची बैठक संपन्न झाली. बैठकीनंतर, सकल मराठा समाज छत्रपती संभाजी महाराज यांच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा देत असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समनव्यक माऊली पवार यांनी माध्यमांना दिली.
हेही वाचा - लसीकरण केलेल्या वारकऱ्यांनाच पंढरपूरमध्ये प्रवेश द्यावा - भोसले
सकल मराठा समाजाकडून चलो कोल्हापूरचा नारा -
16 जून रोजी छत्रपती संभाजीराजे भोसले हे कोल्हापूर येथे मराठा समाजाच्या अरक्षणसाठी मौन आंदोलन करणार आहेत. त्याअनुषंगाने सोलापुरातील शिवाजी प्रशाला येथे सकल मराठा समाजाने बैठक घेऊन छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे आणि सोलापुरातील मराठा बांधवांना 'चलो कोल्हापूर' असा नारा दिला आहे.
सकल मराठा आणि मराठा क्रांती मोर्चा यांची संयुक्त बैठक
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्या बैठका सुरू आहेत. आज सकल मराठाच्या बैठकीवेळी सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात मराठा क्रांती मोर्चाची देखील बैठक आयोजित करण्यात आली होती. सकल मराठा समाजाच्या बैठकीत मराठा क्रांती मोर्चा मधील ज्येष्ठ नेते देखील उपस्थित होते.